नाफेड 31 मेपर्यंत खरेदी करणार तूर - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

सोलापूर - राज्यातील तूरउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन तूर खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात चर्चा केली. राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी तूर खरेदीसाठी 31 मेपर्यंत मुदत वाढ दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.

ते म्हणाले, 'राज्याने केंद्र शासनाकडे तूर खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना तीन मे रोजी पत्रही दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत 31 मेपर्यंत नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीसाठी महाराष्ट्राला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे 31 मेपर्यंत दहा लाख क्विंटल तूर खरेदी केली जाणार आहे. राज्यातील तूरउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र शासनाचे मी आभार मानतो.''

ते म्हणाले, 'राज्यात यंदा विक्रमी तूर खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास पाच लाख टनांपर्यंत तुरीची खरेदी झाली आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मुदतवाढीमुळे तूर खरेदी सुमारे सहा ते सात लाख टनांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. गेल्या अनेक वर्षांतील ही विक्रमी तूर खरेदी आहे.''

राज्यात अद्यापही 13 लाख क्विंटल तूर शिल्लक असण्याची शक्‍यता आहे. 22 एप्रिलनंतर राज्य सरकारने तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात तीन लाख क्विंटल तूर खरेदी झाल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर आता 10 लाख क्विंटल तूर खरेदी नाफेड करणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यंदा राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यापूर्वी कधीही एवढे उत्पादन झाले नव्हते. शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे दिले जात आहेत. यापूर्वीच्या सरकारने जवळपास आठ-नऊ महिने तूर खरेदीचे पैसे दिले नव्हते.
- सुभाष देशमुख, पणनमंत्री

Web Title: tur purchase by naphed 31st may