तूर खरेदीसाठी आता भावांतर योजना - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

महाबळेश्वर - तीन वेळा तूर खरेदीला मुदतवाढ घेण्यात आली. आता तुरीने राज्यातील सर्व गोदामे भरली आहेत. आता यापुढे ऑनलाइन नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, तरीही तूर राहिली तर मध्य प्रदेशाप्रमाणे भावांतर योजना राबविण्याचा राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिली.

महाबळेश्वर - तीन वेळा तूर खरेदीला मुदतवाढ घेण्यात आली. आता तुरीने राज्यातील सर्व गोदामे भरली आहेत. आता यापुढे ऑनलाइन नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, तरीही तूर राहिली तर मध्य प्रदेशाप्रमाणे भावांतर योजना राबविण्याचा राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिली.
रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपात ते बोलत होते. त्या वेळी "रयत क्रांती'चे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, उपाध्यक्ष राहुल मोरे, युवा आघाडीचे अध्यक्ष शार्दूल जाधव, सागर खोत, दीपक भोसले, रवींद्र खोत उपस्थित होते. तूर खरेदीच्या विषयावर श्री. खोत म्हणाले, 'तीन वेळा तूर खरेदीला मुदतवाढ घेण्यात आली, तरीही तूर उरली तर मध्य प्रदेशप्रमाणे भावांतर योजना राबविण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. या योजनेनुसार शेतकऱ्याकडे असलेली तूर खरेदी न करता एकर अथवा हेक्‍टरातील उत्पादन गृहित धरून त्या तुरीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल. लवकरच हा निर्णय घेतला जाईल; परंतु यापुढे तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.''

रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरास आमदार फंडातून दोन लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही खोत यांनी या शिबिरात केली. रयत क्रांती ही संघटना कोणत्या एका विशिष्ट धर्माची अथवा जातीची संघटना नाही ही संघटना राज्यातील आठरापगड जाती धर्मातील लोकांची आहे. शेतकरी दिन दलित दुबळ्या कष्टकरी जनतेची आहे या सर्वांना बरोबर घेऊन समाजात काम करा, असे आवाहनही या वेळी खोत यांनी केले.

अनुदान पिकाच्या यादीत स्ट्रॉबेरीही!
राज्य सरकार अनेक पिकांच्या लागवडीसाठी अनुदान देते. त्यामध्ये स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश नव्हता; परंतु दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने अनुदानाच्या यादीत स्ट्रॉबेरी पिकाचाही समोवश केला आहे. आता सुमारे दोन हजार हेक्‍टर क्षेत्रातील या पिकाला अनुदान मिळेल. या पिकाचे संशोधन केंद्रही लवकरच येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. खोत यांनी दिली.

Web Title: tur purchasing sadabhau khot