टीव्ही अधिक पाहण्याने होतो मानसिक आजार

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

सोलापूर - स्मार्टफोन आल्यापासून दूरचित्रवाणी म्हणजेच टीव्हीचे महत्त्व कमी झाल्याचे वाटत असले तरी आजही मनोरंजन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टीव्ही पाहिला जातो. विज्ञानाची अनोखी भेट असलेल्या टीव्हीवरील योग्य आणि आवश्‍यक कार्यक्रमच पाहायला हवेत. टाइमपास, मनोरंजन म्हणून मनावर परिणाम होईल इतके टीव्ही पाहणे धोक्‍याचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सोलापूर - स्मार्टफोन आल्यापासून दूरचित्रवाणी म्हणजेच टीव्हीचे महत्त्व कमी झाल्याचे वाटत असले तरी आजही मनोरंजन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टीव्ही पाहिला जातो. विज्ञानाची अनोखी भेट असलेल्या टीव्हीवरील योग्य आणि आवश्‍यक कार्यक्रमच पाहायला हवेत. टाइमपास, मनोरंजन म्हणून मनावर परिणाम होईल इतके टीव्ही पाहणे धोक्‍याचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

अलीकडे घरातील सगळे सदस्य एकत्र असल्याचे क्वचितच दिसते, तोच वेळ जर आपण टीव्ही पाहण्यात घालविला तर एकमेकांशी बोलणार कधी? आपण जे पाहतोय त्या ज्ञानाची खरंच गरज आहे का, याचाही विचार करायला हवा. टीव्ही आणि मोबाईलमुळे मानसिक रुग्णांचे प्रमाण वाढत चालल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नितीन भोगे यांनी सांगितले. ताज्या घडामोडी कळण्याचे टीव्ही हे उत्तम माध्यम आहे. इंग्रजी बातमीपत्र ऐकून, पाहून इंग्रजी उच्चार कसे असावे हे शिकता येते. टीव्ही पाहावा पण ते पाहण्याचे वेड असू नये. पालकांनी अनावश्‍यक टीव्ही चॅनेल बंद करावेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा वाहिन्यांची आवश्‍यकता आहे, असे विज्ञान शिक्षिका प्रियांका आराध्ये यांनी सांगितले.

हे लक्षात घ्या...

- टीव्ही पाहण्याचा वेळ ठरवायला हवा.

- टीव्हीमुळे कुटुंबातील सदस्यांचा संवाद कमी होतोय.

- सगळे घरी असतील तेव्हा टीव्ही लावूच नका.

- टीव्हीवरील अनेक गोष्टी काल्पनिक असतात.

चित्रपट आणि मालिकांमध्ये दाखविण्यात येणाऱ्या मारामारीच्या दृष्यांमुळे लहान मुलांवर परिणाम होतो. त्यांच्यातील हिंसात्मक वृत्ती वाढते. अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. मोठ्यांमध्ये झोपेच्या समस्या निर्माण होऊन ताण वाढतो. टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी काल्पनिक असतात, त्यांचा संबंध आपल्या आयुष्याशी जोडू नये. ज्या विषयावर बोलून, चर्चा करून काहीच उपयोग होत नाही त्यासाठी वेळ घालविणे चुकीचे आहे.

- डॉ. नितीन भोगे, मानसोपचारतज्ज्ञ

 

दूरचित्रवाणी ही विज्ञानाची अनोखी भेट आहे. आपण या सुविधेचा चांगला उपयोग करायला हवा. टीव्हीचे लहान मुलांसोबतच मोठ्यांवरही चांगले-वाईट परिणाम होतात. भौगोलिक, विज्ञान, पर्यावरणविषयक कार्यक्रमांतून सर्वांच्या ज्ञानात भर पडते. बालचित्रवाणीसारख्या कार्यक्रमांमुळे प्रत्येक गोष्टीत विज्ञान कसे आहे हे लक्षात येते. लहान मुलांना टीव्ही पाहूच नका म्हणण्यापेक्षा ते पाहण्यापेक्षा हे पाहा असे म्हणणे योग्य ठरेल.

- प्रियांका आराध्ये, जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ

Web Title: TV watching is more mental illness