दोनशेवर गुन्हेगार ‘हद्दपारी’च्या ‘रडार’वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सांगली - वारंवार गुन्हे करणारे मटकाबुकी, जुगार अड्डा मालक आणि गुन्हेगार अशा २०० हून अधिकजणांना हद्दपार करण्याबाबत पोलिसांच्या  हालचाली सुरू आहेत. लवकरच संबंधितांवर हद्दपारीची कारवाई केली जाईल. एवढ्या मोठ्या संख्येने  गुन्हेगारांना हद्दपार करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई ठरेल. हद्दपारीच्या प्रस्तावावरील सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आहे.

सांगली - वारंवार गुन्हे करणारे मटकाबुकी, जुगार अड्डा मालक आणि गुन्हेगार अशा २०० हून अधिकजणांना हद्दपार करण्याबाबत पोलिसांच्या  हालचाली सुरू आहेत. लवकरच संबंधितांवर हद्दपारीची कारवाई केली जाईल. एवढ्या मोठ्या संख्येने  गुन्हेगारांना हद्दपार करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई ठरेल. हद्दपारीच्या प्रस्तावावरील सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आहे.

‘पुढच्यास ठेच... मागचा शहाणा’ याप्रमाणे मोठ्या गुन्हेगारांवर कारवाई केली, त्यांचे बगलबच्चे  आपोआपच थंड पडतात. गुन्हेगारांवर सतत कारवाई केल्यास त्यांच्यावर कायद्याचा धाक राहतो. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात ‘मोका’, ‘झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार स्थानबद्ध’  आणि ‘हद्दपारी’ ही पोलिसांकडे असलेली कारवाईची परिणामकारक शस्त्रे आहेत. त्याचा योग्यवेळी वापर करण्याची गरज आहे. या कारवाईचे शस्त्र वापरण्यास सक्षम कागदपत्रे बनवून प्रस्ताव करावे लागतात.  त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची इच्छाशक्तीही महत्त्वाची असते. पोलिसांकडे असलेल्या लाठी, रिव्हॉल्व्हर, रायफल या शस्त्रापेक्षा त्यांच्याकडील लेखनी हे प्रभावी शस्त्र ठरू शकते. 

पाच वर्षांत सांगली पोलिसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांना ‘मोका’ लावला. सध्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तर दाखल झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत चार टोळ्यांना ‘मोका’ लावला. आठ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. तसेच काहींना हद्दपारही केले. कोल्हापूर परिक्षेत्रात २८ गुंडांना स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव बनवले गेलेत. त्यात जिल्ह्यातील आठ गुंडांचा समावेश आहे. परिक्षेत्रात हद्दपारीचे ५५२ प्रस्ताव आहेत. त्यातही जिल्ह्यातील सर्वाधिक प्रस्ताव आहेत. 

पोलिस कायद्यानुसार हद्दपारीचे २३ प्रस्ताव बनवलेत. त्यात २०० हून अधिक गुन्हेगारांचा समावेश आहे. वारंवार गुन्हे करणारे मटका बुकी, जुगार अड्डा मालक आणि गुन्हेगार यांना लवकरच जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

कलम ५५ प्रमाणे गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे अधिकार पोलिस अधिकाऱ्यांना आहेत. हद्दपारीच्या प्रस्तावावर उपाधीक्षकांनी चौकशी पूर्ण केली आहे. हद्दपारीच्या प्रस्तावांची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. २०० हून अधिकजणांना हद्दपार केले जाण्याची शक्‍यता आहे. हद्दपारीच्या अंतिम निकालाकडे लक्ष लागले आहे.

हद्दपारांवर हवी नजर 
पोलिसांची हद्दपारीची कारवाई बऱ्याचदा कागदावर दिसते. हद्दपार गुन्हेगार आदेशाचा भंग करून परिसरात फिरत असतात. नुकताच हद्दपारीचा भंग करून जिल्ह्यात आलेल्या रवींद्र माने या गुंडाचा भरदिवसा निर्घृण खून झाला. त्यामुळे हद्दपार गुन्हेगार परिसरात फिरत नाहीत ना? याकडे पोलिसांचे लक्ष हवे.  गुन्हेगारांना ओळखणाऱ्या नागरिकांनीदेखील पोलिसांना माहिती दिली पाहिजे.

Web Title: Twenty hundred criminals