वीस लाखांच्या बनावट नोटा कोल्हापुरात जप्त

वीस लाखांच्या बनावट नोटा कोल्हापुरात जप्त

कोल्हापूर - बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक केली असून, त्यामध्ये एका पोलिसपाटलाचा समावेश आहे.

अटक केलेल्या संशयितांकडून पाचशे व दोन हजार रुपयांच्या वीस लाख तीन हजार पाचशे रुपये किमतीच्या बनावट नोटा तसेच ५२ हजार ५८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व संशयितांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी : बाळू सुलेमान नायकवडी (वय ५६, रा. बामणी, ता. कागल), प्रवीण नारायण गडकर (३६, रा. गडबिद्री ता. भुदरगड), विक्रम कृष्णात माने (३२, रा. बेडीव ता. भुदरगड), गुरुनाथ दादू पाटील (२५, रा. बामणे ता. भुदरगड). यातील प्रवीण गडकर हा गडबिद्री गावाचा पोलिसपाटील आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांत फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार माहिती घेत असताना कागल पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेला व फरारी असलेला बाळू नायकवडी हा बुधवारी (ता. २०) बाचणी येथील एसटी स्टॅंड परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या.

हे पथक बाचणी एसटी स्टॅंड चौकात टेहळणी करत असताना येथील शेतकरी सेवा केंद्राच्या दारात बाळू नायकवडी हा दुचाकीसह आढळला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्या दुचाकीची डिकी तपासली असता त्यामध्ये ५०० रुपयांच्या ६२६ बनावट नोटा मिळाल्या. पोलिसांनी या नोटा ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मित्र प्रवीण गडकर व विक्रम माने यांच्या मदतीने त्यांचा छायाचित्रकार मित्र गुरुनाथ पाटील याला पैशाचे आमिष दाखवून बनावट नोटा तयार केल्याचे व त्या खपवण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली दिली.

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत पथकाने लागलीच प्रवीण गडकर व विक्रम माने यांना मडिलगे फाटा येथील श्री कलेक्‍शन या दुकानातून ताब्यात घेतले. तसेच घरामध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या गुरुनाथ पाटील याला त्याच्या बामणी येथील घरातून ताब्यात घेतले. या वेळी त्याच्या घरात दोन हजार रुपयांच्या ४५६ बनावट नोटा व पाचशे रुपयांच्या १ हजार ५५७ बनावट नोटा, अशा एकूण १६ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा मिळाल्या. तसेच तेथे बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले संगणक, कलर प्रिंटर कम स्कॅनर, कागद, पेपर कटर, पेनड्राईव्ह असा एकूण ५२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी कागल पोलिस ठाण्यात या चारही संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काही तासांतच संशयित ताब्यात 
फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या बाळू नायकवडीकडे बनावट नोटा मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनीही त्यांना पुढील कारवाई तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नायकवडी याच्याकडून अधिक माहिती मिळवत अवघ्या काही तासांत पथकाने अन्य तिन्ही संशयितांना अटक करून त्यांच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या. कारवाईत हेडकॉन्स्टेबल अमोल कोळेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

पाच महिन्यांपासून सुरू होते काम 
झटपट पैसे मिळवण्याच्या हेतूने बाळू नायकवडी याने बनावट नोटा तयार करण्याची कल्पना मित्रांना दिली. त्यानुसार सप्टेंबर २०१८ पासून या चौघांनी कामाला सुरवात केली. बाजाराच्या ठिकाणी वृद्ध अशिक्षित लोकांना गाठून त्यांना या बनावट नोटा खपवण्याची पद्धत टोळीने अवलंबली होती.

पोलिसपाटीलच अडकला गुन्ह्यात
या टोळीतील बाळू नायकवडी फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आहे. त्याचा मित्र प्रवीण गडकर हा गडबिद्री येथील पोलिसपाटील म्हणून काम पाहत आहे. कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याचे आमिष नायकवडी याने गडकरला दाखवले व यालाच बळी पडून गडकर यात सक्रिय झाला. त्यानेच विक्रम माने व गुरुनाथ पाटील यांच्याशी संपर्क करून या अवैध कृत्याची सुरवात केली. गावचा पोलिसपाटील अशा गंभीर गुन्ह्यात अडकल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com