बसथांब्यावरच तिने दिला जुळ्यांना जन्म; आरोग्यकेंद्राचा निष्काळजीपणा

बसथांब्यावरच तिने दिला जुळ्यांना जन्म; आरोग्यकेंद्राचा निष्काळजीपणा

मिरज - प्रसूतिवेदना सहन करत ती आरोग्य केंद्रात आली. मात्र तिला दवाखान्यात दाखल करून न घेता मिरजेला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. या महिलेने डफळापूरच्या बसथांब्यावरच गोंडस जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुले आहेत. महिलेचे नाव कल्पना अनिल लोखंडे असे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलेल्या वागणुकीबद्दल नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

कल्पना डफळापूरपासून ११ किलोमीटरवर बसाप्पावाडी येथे राहते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. रविवारी तिला रात्रभर प्रसूतिकळा सुरू होत्या. सकाळी १० च्या सुमारास ती पती व लहान मुलांसोबत डफळापूरच्या आरोग्य केंद्रात आले. रुग्णांची गर्दी होती. तिला केसपेपर काढण्याचेही भान नव्हते. पती बाहेर बसून होता. तिची अवस्था पाहून एका परिचारिकेने केस पेपर करून दिला. केसपेपर घेऊन ती गर्दीतून डॉ. अभिजित चोथे यांच्या कक्षात गेली. डॉ. अभिजित यांनी तपासणी करून घेतली. ‘तुमचे बाळंतपण येथे होणार नाही. तुम्ही ताबडतोब मिरजेच्या शासकीय रुग्णालयात जा’ असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. 

आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आठ दिवसांपासून बंद आहे, असे सांगून तिला मिरजेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही टाळली. हताश महिला पायी चालत कशीतरी बसथांब्यापर्यंत आली. दरम्यान, एका घरातून तांब्याभर पाणी मागून घेण्यात आले. नंतर बसची प्रतीक्षा करत दुरवस्था झालेल्या बसस्थानकात बसून होती. बस यायला बराच वेळ लागला. तासभर वाट पाहत होते. वेदना सहन होत नव्हत्या. ती आरडाओरडा करू लागली. तिची अवस्था पाहून तिचा लहान मुलगाही जोरात रडू लागला.

पतीला काही सुचत नव्हतं. वेड्यासारखा बसथांब्यावर इकडेतिकडे धाऊ लागला. गोंधळामुळे बघ्यांची गर्दी वाढली. काही महिला मदतीसाठी सरसावल्या. गर्दीत जयश्री कोळी ही आशा वर्कर्स महिला होती. तिने पुढाकार घेत असाह्य महिलेची सुरळीतपणे प्रसूती केली. जुळी मुले जन्माला आली. गर्दीतूनच एकाने आपत्कालीन रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिका तत्काळ आली. नंतर पुन्हा त्या महिलेला डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोन्ही बाळं व बाळंतीण सुखरूप आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com