खिद्रापुरेच्या आणखी दोन एजंटांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

मिरज - म्हैसाळ येथे डॉ. खिद्रापुरेच्या स्त्रीभ्रूणहत्याकांड प्रकरणातील आणखी दोन एजंटांना पोलिसांनी अटक केली. तपासाची सूत्रे सांगलीच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे आल्यानंतर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. 

मिरज - म्हैसाळ येथे डॉ. खिद्रापुरेच्या स्त्रीभ्रूणहत्याकांड प्रकरणातील आणखी दोन एजंटांना पोलिसांनी अटक केली. तपासाची सूत्रे सांगलीच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे आल्यानंतर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. 

स्वाती जमदाडेच्या पतीची डॉ. खिद्रापुरेशी भेट घडवून आणणाऱ्या संदीप विलास जाधव (वय 32, शिरढोण, ता. शिरोळ) आणि कागवाड (कर्नाटक) येथील वीरेनगोडा रावसाहेब गुमटे (वय 49) या एजंटांना अटक झाली आहे. गर्भपात करताना स्वातीचा मृत्यू झाल्याने उघडकीस आलेल्या म्हैसाळमधील स्त्रीभ्रूणहत्याकांड प्रकरणातील एजटांची संख्या वाढते आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्याकडून डॉ. काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

डॉ. काळे यांनी तपासात उघडकीस आणलेल्या दोघा एजंटांत संदीप जाधवचा समावेश आहे. त्याला सोमवारी शिरढोणमधून (ता. शिरोळ), तर कागवाडमधून गुमटे या दुसऱ्या एजंटास अटक करण्यात आली. या दोघांसह यापूर्वी अटक केलेल्या डॉ. श्रीहरी घोडके, उमेश साळुंखे, कांचन रोजे, डॉ. रमेश देवगिरकर, सुनील खेडेकर या सात जणांना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

भ्रूणहत्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, महाराष्ट्रासह कर्नाटकात धागेदोरे आहेत. पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी तपासासाठी सात अधिकाऱ्यांचा सहभाग असलेली पाच पथके नेमली आहेत. या पथकास जादा गाड्या आणि मनुष्यबळ दिले आहे. 

दरम्यान, म्हैसाळ भ्रूणहत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच मिरज, करंजे, खटाव, माळवाडी, मसुचीवाडी येथील घटनांची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने (एसएफआय) उद्यापासून (ता. 14) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. 

औषध कंपनीतील कर्मचारीही रडारवर 
गर्भपातासाठी लागणारी औषधे माधवनगरचा सुनील खेडेकर ज्या कंपनीतून विकत घेत असे, त्या मुंबईतील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्याने ती बेकायदा विकत घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या कंपनीचे कर्मचारीही पोलिसांच्या रडारवर आहेत.

Web Title: two agents arrested khidrapure