आटपाडी तालुक्यात दोन पूल गेले वाहून

तळेवाडी (ता. आटपाडी) - पाण्याने वाहून गेलेला येथील माणगंगा नदीवरील पूल.
तळेवाडी (ता. आटपाडी) - पाण्याने वाहून गेलेला येथील माणगंगा नदीवरील पूल.

आटपाडी - दुष्काळी आटपाडी तालुक्‍यावर यंदा परतीचा पाऊस प्रसन्न झाला असून, सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्‍यातील अनेक ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पुलावरून जादा पाणी वाहिल्याने दोन पूल कोसळले आहेत. निंबवडे तलावाला भेगा पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच माणगंगाही नदीही प्रदीर्घ वर्षांनंतर वाहू लागली. जिल्हा परिषद प्रशासनाने माणगंगा नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.                

दुष्काळी भागात पाऊस उघडायचे नाव घेईना. या भागात माळवदी घरांची प्रचंड संख्या असून या पावसाचा मोठा फटका माळवदी घरांना बसला आहे. बहुतांश सर्वच घरे गळू लागली आहेत. धोकादायक बनली आहेत. यामध्ये करगणी- तळेवाडी आणि आवळाईचा पूल कोसळला आहे. पाण्यामुळे तो वाहूनच गेला आहे. या पुलाचे बांधकाम नुकतेच झाले आहे. ग्रामस्थांनी बांधकामावर शंका उपस्थित केली आहे.

येथील वाहतूक बंद झाली आहे.  तसेच वाड्या-वस्त्यावरील लोकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेकांना चिखलातून मार्ग काढत गावात यावे लागत आहे. त्यामुळे अनेकांनी ही घरे सोडली आहेत. अनेक गावात जुनी घरे सततच्या ओलीमुळे कोसळली आहेत. घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.  या भागात फार उंचीचे पूल नाहीत. त्यामुळे ते पाण्याखाली गेले आहेत. आठ पुलांवरून पाणी गेले आहे.

निंबवडे तलाव भरला आहे. तसेच सतत पाऊस पडत असल्यामुळे तलावाचा भराव खचल होता. आज दुपारी त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तलावाखालील लोकांत खळबळ उडाली आहे. तलावाला सीलदार सचिन  लंगुटे आणि पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.  माणगंगा नदीलाही पाणी आले आहे. शेतीपिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. 

राजेवाडी तलावात पाणी वाढत असल्याने आटपाडी तालुक्‍यातील माणगंगा नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे. या भागात आरोग्य आणि पाणीपुरवठ्याच्या सेवांबाबत ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
- अभिजित राऊत,
सीईओ, जिल्हा परिषद, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com