शाहू समाधिस्थळ कामासाठी दोन कोटींची तरतूद करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

शाहू समाधिस्थळाच्या उर्वरित कामासाठी येत्या अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद करा, अशी सूचना महापौर सरिता मोरे यांनी आढावा बैठकीत केली. तसेच प्राथमिक टप्प्यातील कामे लवकर पूर्ण करा, अशी सूचनाही केली.

कोल्हापूर - शाहू समाधिस्थळाच्या उर्वरित कामासाठी येत्या अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद करा, अशी सूचना महापौर सरिता मोरे यांनी आढावा बैठकीत केली. तसेच प्राथमिक टप्प्यातील कामे लवकर पूर्ण करा, अशी सूचनाही केली.

उपशहर अभियंता एस. के. माने यांनी १ कोटी १० लाखांचे मेघडंबरी व स्टेजचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. या समाधिस्थळाच्या परिसराभोवती कंपौडवॉलचे ९७ लाखांचे काम प्रगतीपथावर आहे. मेनगेट ते समाधिस्थळापर्यंत पाथवे करणे, लॅण्डस्केपिंग करणे, लाईट इफेक्‍टस, लॉन करणे व इतर कामाचे ७५ लाखांचे बजेट तयार आहे. उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, शाहू समाधिस्थळासाठी ७५ लाखांचे बजेटची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आर्किटेक्‍चर अभिजित जाधव यांनी समाधिस्थळाच्या जागेवर ८ प्लेट्‌स बसविल्याचे सांगितले.

शाहू महाराजांच्या जन्म आणि कर्मभूमीतील विविध ठिकाणांची पवित्र मृदा कलशात घेऊन मेघडंबरीच्या दगडी पेटीत ठेवणे बाकी आहे. ती मृदा जमा झाल्यानंतर सर्व पदाधिकारी व समितींच्या सदस्यांच्या समोर समाधिस्थळाच्या जागेवर पेटीत ठेवण्यात येणार आहे. 

यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अनुराधा खेडकर, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आदिल फरास, अफजल पिरजादे उपस्थित होते.

जागेच्या मालकीसाठी प्रस्ताव
 आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सुधारित अंदाजपत्रकात ७५ लाखांची व नवीन अंदाजपत्रकात १.२५ कोटींची तरतूद केली आहे. समाधिस्थळाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक निधीसाठी डिपीडीसी व समाजकल्याण विभागास ही जागा महापालिकेच्या मालकीची राहावी, या अटीवर प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two cores needed to construction of Shahu Samadhi