पालकमंत्र्यांसह दोन माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात 

तात्या लांडगे
बुधवार, 20 जून 2018

सोलापूर : काही महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीला प्रारंभ झाला. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या या निवडणुकीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह माजी आमदार दिलीप माने, सिद्रामप्पा पाटील आणि माजी आमदार रतिकांत पाटील यांचा मुलगा अमर पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

सोलापूर : काही महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीला प्रारंभ झाला. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या या निवडणुकीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह माजी आमदार दिलीप माने, सिद्रामप्पा पाटील आणि माजी आमदार रतिकांत पाटील यांचा मुलगा अमर पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

बाजार समितीवर सत्ता मिळविण्याच्या उद्देशाने सहकारमंत्र्यांसह भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी नेतेमंडळी सक्रिय झाले आहेत. शेतकरी मतदारांच्या बांधावरुन प्रचाराला सुरूवात झाली असून दुसरीकडे कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रणिती शिंदे यांनीही बाजार समितीत सत्ता मिळावी म्हणून कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. या निवडणुकीत दोन मतदारसंघात सरळ लढत होत असून कळमण, मार्डी, बाळे, नान्नज आणि मुस्ती गणातून तिरंगी लढत होत आहे. अन्य मतदारसंघात चौरंगी तर काही ठिकाणी पाच-सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वसाधारपणे एका मतदारसंघात सहा हजार ते नऊ हजार मतदार आहेत. 

दोन हजार मतांवर विजय निश्‍चित 
बोरामणी गणात 10 हजार 440 मतदार असून त्याठिकाणी आठ तर कणबस गणात सहा हजार 758 मतदार असून सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच होटगी व मंद्रूप गणातून प्रत्येकी पाच उमेदवार असून दोन्ही मतदारसंघात 19 हजार 15 मतदार आहेत. त्यानंतर कंदलगाव व भंडारकवठे गणातून प्रत्येकी चार उमेदवार असून दोन्ही गणात मतदारसंख्या 17 हजार 278 आहे. औराद गणातून सहा उमेदवार असून मतदारसंख्या आठ हजार 774 इतकी आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या पाहता कोणत्याही उमेदवाराला कमाल दोन हजार मते मिळाल्यास तो विजयी होण्याची शक्‍यता आहे. 

पालकमंत्र्यांसमोर अपक्षाचे आव्हान 
बाजार समितीमध्ये प्रथमच कुंभारी गणातून निवडणुकीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख उभारले आहेत. त्यांच्याविरुध्द दक्षिण सोलापूरच्या पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील यांचे पती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक शिरीष पाटील हे भाजपकडून या गणातून उभारले आहेत. तसेच विजय हत्तुरे, सिध्दाराम चाकोते, विश्‍वनाथ शेगावकर, मळसिध्द गुंडे, सिध्दाराम भोरगड्डे या अपक्ष उमेदवारांचे कडवे आव्हान आहे. कुंभारी गणाची मतदारसंख्या आठ हजार 776 असून उमेदवार मात्र सात आहेत. त्यामुळे बाराशे ते तेराशे मतदान पडलेला उमेदवार यामध्ये विजयी होवू शकतो. 

पाकणी, हिरज गणातून थेट लढत 
पाकणी व हिरज गणातून बाजार समितीसाठी थेट लढत होत आहे. पाकणी गणातून प्रकाश वानकर यांच्याविरुध्द सुनील गुंड तर हिरज गणातून माजी आमदार दिलीप माने यांच्याविरुध्द पाथरीचे श्रीमंत बंडगर यांच्यात सरळ लढत होत आहे. या दोन्ही मतदार संघात एकही अपक्ष उमेदवार नाही. पाकणी गणात पाच हजार 258 तर हिरज गणात सहा हजार 650 मतदार आहेत. त्यामुळे अडीच ते तीन हजार मतदान पडलेला उमेदवार यामध्ये विजयी होवू शकतो.

Web Title: Two former MLAs, including Guardian Minister, are in the election fray