सीपीआर आवारात दोन गट भिडले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

कोल्हापूर - रजपूतवाडी (ता. करवीर) येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या मारामारीचे पर्यवसान सीपीआर आवारात आज रात्री हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी अर्वाच्य शिवीगाळ करत चप्पल व दगडफेक केली. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. तासभर हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले; मात्र रात्री उशिरापर्यंत दोन्ही गट या परिसरातच घुटमळत राहिल्याने तणाव कायम होता. 

रजपूतवाडी (ता. करवीर) येथे शांताबाई गोसावी (वय 45) आणि मंगल जाधव (वय 50, दोघे रा. गोसावी गल्ली, रजपूतवाडी) येथे राहतात. खेळण्याच्या कारणावरून लहान मुलाला झालेल्या मारहाणीतून दोन गट आमनेसामने आले. यामध्ये झालेल्या मारहाणीत गोसावी व जाधव या दोन्ही महिला जखमी झाल्या. त्यांना नातेवाइकांनी व शेजाऱ्यांनी सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआरच्या आवारात दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यातील एक गट करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निघाला असता सीपीआरच्या आवारात उभा असलेला दुसरा गट आक्रमक झाला. त्यातील महिलांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसे दोन्ही गटांतील तरुण आक्रमक झाले. त्यांनी एकमेकांच्या दिशेने दगड व चप्पल भिरकवण्यास सुरवात केली. त्यामुळे तणाव वाढला. सीपीआरमधील सुरक्षारक्षकांनी स्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना प्रवेशद्वाराबाहेर काढले; मात्र सीपीआरसमोरील रस्त्यावर पुन्हा हे दोन एकमेकांस भिडले. याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांना पांगवले; पण काही वेळानंतर दोन्ही गटांच्या महिला तेथे पुन्हा जमा झाल्या. त्यामुळे तणाव कायम होता. रात्री उशिरा याबाबत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Web Title: The two groups went to the premises of CPR