एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या 200 अद्ययावत बस आहेत तरी कशा ? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

एसटी महामंडळाची साधी गाडी, निमआराम बस, शिवनेरी, शिवशाही आरामबस, परिवर्तन बस, मिनीबस अशा प्रकारच्या बसगाड्यांतून राज्यभर प्रवासी सेवा दिली जाते. रोज सुमारे अडतीस लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

कोल्हापूर - प्रवाशांना सुरक्षित व सुखकर प्रवास वर्षानुवर्षे घडवणाऱ्या एसटी महामंडळाच्या एसटीच्या ताफ्यात अत्याधुनिक स्वरूपाच्या नवीन स्लीपर कोच दोनशे बस गाड्या समाविष्ट होत आहेत. यातील 45 गाड्या कोल्हापुरातून पासिंग होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच राज्यातील प्रवाशांना महत्त्वाच्या शहराकडे आरामदायी सुरक्षित प्रवास करता येणार आहे. या गाडीचे लवकरच नामकरणही होणार आहे. 

एसटी महामंडळाची साधी गाडी, निमआराम बस, शिवनेरी, शिवशाही आरामबस, परिवर्तन बस, मिनीबस अशा प्रकारच्या बसगाड्यांतून राज्यभर प्रवासी सेवा दिली जाते. रोज सुमारे अडतीस लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यासाठी एसटी महामंडळाकडे 36 हजार गाड्या प्रवासी सेवा देतात. यात प्रवाशांना अधिक सुखकर, आरामदायी प्रवास करता यावा; विशेषतः दीर्घपल्ल्याचा प्रवास झोपून करता यावा, यासाठी नवीन बस या ताफ्यात दाखल केल्या आहेत. 

परिवहनमंत्री दिवाकर रावते व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या पुढाकाराने या नव्या बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यातील 45 बस कोल्हापुरात विभागीय कार्यशाळेत पासिंगसाठी दाखल झाल्या. 

अशी आहे या बसची रचना

या बसची रचना अशी की, चालकाचा कक्ष प्रशस्त आहे. त्याच्या शेजारी ध्वनिक्षेपक आहे. यातून कोणत्या गावचा थांबा आला आहे, प्रवाशांनी कोठे उतरावे व गाडीत बसावे, याच्या सूचना चालक गाडीतील प्रवाशांना देणार आहे. तसेच या गाडीत एक स्वयंचलित यंत्रणा असून या यंत्रणेद्वारेही बस नेमकी कोणत्या मार्गावर आहे, हे एसटी महामंडळ, वाहतूक पोलिस तसेच आरोग्य विभाग यांच्या संकेतस्थळावर दिसणार आहे. जेणेकरून काही तांत्रिक बिघाड झाला अथवा अघटित घडल्यास त्याची माहिती या तिन्ही शासकीय यंत्रणांना समजणार आहे. यातून गाडीतील प्रवाशांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता येणार आहे. 

प्रत्येक आसनाजवळ विशिष्ट प्रकारची कळ (बटन) आहे. ती कळ दाबून गाडी थांबवण्याची सूचना करता येणे शक्‍य आहे. काही धोकादायक घटना घडत असल्यास ही कळ प्रवाशांनी वापरायची आहे. याशिवाय संकटकाळात प्रवाशांना बाहेर पडण्याचा मागील बाजूला दरवाजा आहे. तसेच छतालाही चार ठिकाणी झरोके आहेत. प्रवाशांना गाडीत मोबाईल चार्जिंगचीही सुविधा आहे. अशा विविध सोयींनीयुक्त आराम बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, या गाड्यांची बांधणी बेळगाव येथे झाली आहे. 

दोन प्रकारची आसनव्यवस्था 
एसटीच्या नवीन बसमध्ये ज्या प्रवाशांना बसून प्रवास करायचा आहे अशांसाठी आरामदायी आसन व्यवस्था (बैठ्या खुर्च्या) आहे. तर त्याच्याच वरील बाजूला झोपण्यासाठी दोन बेड आहेत. या बेडसोबत उशीसुद्धा आहे. बहुतेक बसस्थानकांवरून दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी या बसचा वापर होणार आहे. निमआराम बसला पर्यायी बस म्हणून या बसचा वापर होणार आहे. त्याचे भाडेही किफायतशीर दरात असणार आहे, अशी माहिती विभागीय कार्यशाळेचे अधिकारी ऑल्विन रोड्रिक्‍स यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hundred New Buses In ST Service