कार दरीत कोसळून दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

पुण्याहून नगरकडे जाणारी कार (एमएच 04 बीवाय 9622) पळवे फाटा येथे हॉटेल जगदंबजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडकून थेट दरीत कोसळली.

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर पळवे फाट्याजवळ भरधाव कार रस्त्याच्या कठड्याला धडकून दरीत कोसळल्याने त्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. 

पुण्याहून नगरकडे जाणारी कार (एमएच 04 बीवाय 9622) पळवे फाटा येथे हॉटेल जगदंबजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडकून थेट दरीत कोसळली. या अपघातात कारमधील प्रतीक ललितकुमार राठोड (रा. तळेगाव दाभाडे), नमन कोठारी (रा. बंगळूर) जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच सुप्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील सरकारी दवाखान्यात पाठविले. अपघातानंतर महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 

मृतदेह बाहेर काढण्यासाठी कसरत 
अपघाताची भीषणता एवढी होती की, मोटारकार उद्‌ध्वस्त झाल्याने पेट्रोलला गळती लागली होती. त्यामुळे गॅस कटरचा वापर करून मृतदेह बाहेर काढता येत नव्हते. सुमारे दोन तास परिश्रम करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

अजून किती बळी हवेत 
नगर-पुणे महामार्गावर अनेक अपघात होतात. वेडीवाकडी वळणे व अनेक ठिकाणी दुभाजक तुटलेले असूनही त्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याची खबरदारी घेतली जात नाही. काही वळणावर, चौकात, पुलावर सातत्याने अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला, तरीसुद्धा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. अधिकाऱ्यांना किती बळी हवे आहेत, असा प्रश्‍न महामार्गावर असणाऱ्या प्रत्येक गावातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. 

चालकाने काळजी घ्यावी 
रात्री भरधाव मोटारकार चालविणे, सीटबेल्ट न लावणे या कारणामुळे अशा भीषण अपघातात मोटारीतील प्रवासी वाचू शकत नाहीत. त्यासाठी चालकाने मोटारकार चालविताना दक्षता घेणे गरजेचे आहे. 
- अनिल औटी, पोलिस उपनिरीक्षक, महामार्ग पोलिस 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in car crash