वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बिबट्यांच्या मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

ग्रामस्थांनी आज पहाटे चारच्या सुमारास दोन बिबट्यांच्या झुंजीचा, फोडलेल्या डरकाळ्यांचा आवाज ऐकल्याची माहिती मिळाली. त्यातच एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

संगमनेर : तालुक्‍यातील गुंजाळवाडी व निमगाव पागा परिसरातील घटनांमध्ये मादी व नरबिबट्याला प्राण गमवावे लागले. गुरुवारी (ता. 28) रात्री व आज पहाटे या घटना घडल्या. 

नाशिक-पुणे महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात वीज उपकेंद्राजवळ गुरुवारी (ता. 28) रात्री पावणेबाराच्या सुमारास अंदाजे एक वर्ष वयाच्या मादी-बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. गुंजाळवाडीकडून आलेला हा बिबट्या महामार्ग ओलांडताना अपघात झाला. याबाबत स्थानिकांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर संगमनेर वनपरिक्षेत्र-दोनचे वनक्षेत्रपाल सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंबादास मेहेत्रे, वनरक्षक संतोष पारधी व योगेश डोंगरे यांनी मृत बिबट्याला निंबाळे येथील वनरोपवाटिकेत हलविले. तेथे उत्तरीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा भाऊसाहेब कर्तव्यावर आहेत 

अंगावर गंभीर जखमा

या परिसरात रात्री 10 ते 12 वाजेदरम्यान मादी-बिबट्या व दोन बछडे विवेक कुलकर्णी व सतीश आहेर यांच्यासह अनेकांनी पाहिले होते. शहरालगतच्या मालदाड, पावबाकी परिसरातही बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते. 
दरम्यान, निमगाव पागा येथील अशोक पुंजाजी कानवडे यांच्या शेतातील घासात आज पहाटे अंदाजे सात महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या अंगावर गंभीर जखमा असून, त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा.

दोन बिबट्यांची झुंज

ग्रामस्थांनी आज पहाटे चारच्या सुमारास दोन बिबट्यांच्या झुंजीचा, फोडलेल्या डरकाळ्यांचा आवाज ऐकल्याची माहिती मिळाली. त्यातच एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. बिबट्याचे डोके, मान व पोटावर दात व नखांनी झालेल्या जखमांच्या खुणा आढळून आल्या. संगमनेर खुर्द येथील वनरोपवाटिकेत उत्तरीय तपासणी केल्यानंतर वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. आर. पाटोळे, वनरक्षक जी. बी. पवार यांनी त्याचे दफन केले. 

हेही वाचा साईमंदिराचा जागतिक विक्रम 

बिबट्यांचे मृत्यू वाढले

संगमनेर तालुक्‍यातील भक्ष्य व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, तसेच लपण्यासाठी उसाचे मुबलक क्षेत्र, अशा आदर्श अधिवासामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहे. रस्त्यावरील अपघात, भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडून बुडाल्याने, तसेच अपापसांतील संघर्षातून संगमनेर वनपरिक्षेत्रांतर्गत वर्षभरात अंदाजे 12 बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two leopards dead In different instances