पालिका दोन... मुख्याधिकारी एक!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

महाबळेश्‍वर - महाबळेश्‍वरच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्याकडे महाबळेश्‍वर व पाचगणी या दोन नगरपालिकांची जबाबदारी असल्याने दोन्ही पालिकांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. मुख्याधिकाऱ्यांकडून कमी वेळ मिळत असल्याने पालिकेचे कामकाज कासवगतीने चालू आहे. कामकाजावर परिणाम झाल्याने नगरसेवकही नाराजी व्यक्त करत आहेत. पाचगणी पालिकेला स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

गेल्या वर्षापासून दगडे-पाटील यांच्याकडे महाबळेश्‍वर व पाचगणी या दोन पालिकांचा कारभार सोपविण्यात आला आहे. त्या अगोदरही त्यांच्याकडे महाबळेश्‍वर, पाचगणीसह मेढा येथील चार्ज होता. मागील वर्षी देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात महाबळेश्‍वर व पाचगणी या दोन्ही पालिकांनी सहभाग घेतला होता. या दोन्ही पालिकांचा कारभार करताना मुख्याधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. या अभियानात पाचगणी पालिकेचा अव्वल क्रमांक आला. मात्र, महाबळेश्‍वर पालिकेला पहिल्या दहामध्येही स्थान मिळविता आले नाही. महाबळेश्‍वर पालिका १९ व्या स्थानावर गडगडली. महाबळेश्वर पालिकेचा क्रमांक घसरल्याने काही नगरसेवक संतप्त झाले. नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी सर्वसाधारण सभेत मुख्याधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोपही केला. अनेकांनी मुख्यधिकाऱ्यांची पाठराखणही केली. 

पाचगणी पालिकेचा अतिरिक्त भार असतानाही मुख्याधिकारी या पाचगणी पालिकेला जास्त वेळ देवू लागल्याने महाबळेश्‍वर पालिकेच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. मुख्याधिकारी पालिकेत नसल्याने पालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारीही वेळकाढूपणा करताना दिसत आहेत. नागरिकांनाही कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. या संदर्भात महसूल विभागही पालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.

स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्याची मागणी
मुख्याधिकाऱ्यांकडे दोन-दोन पालिकांचा कारभार असल्याने पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे, अशी तक्रार आता नगरसेवक करीत आहेत. कोणत्याही एकाच पालिकेचा कारभार मुख्याधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावा व एका पालिकेवर नव्याने मुख्याधिकारी नेमावा, अशी मागणी आता दोन्ही शहरांतून जोर धरत आहे.

Web Title: Two municipal corporation & one officer