दोन पोलीस लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

तक्रारदाराचा भाऊ व त्याच्याकडे कामाला असणाऱ्या एका मुलाविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात आरोपींना अटक न करण्यासाठी वरील दोघांनी चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

नगर : शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस शिपाई ज्ञानेश्‍वर पाराजी सुपेकर, विशाल रामा मैद (दोघे नेमणूक शिर्डी पोलिस ठाणे) अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा, बघा 55 लाखांचा शोध कसा लागला? 

अधिक माहिती अशी

तक्रारदाराचा भाऊ व त्याच्याकडे कामाला असणाऱ्या एका मुलाविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात आरोपींना अटक न करण्यासाठी वरील दोघांनी चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तडजोडीअंती पैसे 22 नोव्हेंबर 2019 रोजी शिर्डी ते कोपरगाव रस्त्यावरील पुणतांबे चौफुला येथील एका हॉटेलमध्ये देण्याचे ठरले.

हेही वाचा, माध्यमिक, वेतनपथक कार्यालयास नरकयातना 

संशय आल्याने पोलिसांनी लाच स्वीकारली नाही

त्यानुसार पोलिस कर्मचारी पैसे घेण्यासाठी तेथे गेले असता त्यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, त्याचवेळी तक्रारदाराच्या हालचालीचा संशय आल्याने पोलिसांनी लाच स्वीकारली नाही. त्यामुळे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. 

कर्मचाऱ्यांच्या घरांची झडती

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांची झडती घेतली असून, सध्या ते पसार आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नगरचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर, निरीक्षक श्‍याम पवरे, दीपक करांडे, पोलिस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, रवींद्र निमसे यांच्या पथकाने केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two policemen arrested for taking bribe