नेर्ली-अपशिंगेत सापडले  दोन गद्धेगाळ शिल्प : यादव-आदिलशाहीकालीन आज्ञापत्राची माहिती उघड 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

मिरज (सांगली)-  कडेगाव तालुक्‍यातील नेर्ली आणि अपशिंगे येथे दोन गद्धेगाळ शिल्प मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना मिळाले. ही शिल्पे यादव आणि आदिलशाहीकालीन असून, राजाज्ञा किंवा नियम मोडू नये, यासाठी कोरलेली असतात. त्यावर शाप वचनसारखी वाक्‍ये कोरलेली असतात. गाढव आणि स्त्री यांचे शिल्प त्यावर असते. 

मिरज (सांगली)-  कडेगाव तालुक्‍यातील नेर्ली आणि अपशिंगे येथे दोन गद्धेगाळ शिल्प मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना मिळाले. ही शिल्पे यादव आणि आदिलशाहीकालीन असून, राजाज्ञा किंवा नियम मोडू नये, यासाठी कोरलेली असतात. त्यावर शाप वचनसारखी वाक्‍ये कोरलेली असतात. गाढव आणि स्त्री यांचे शिल्प त्यावर असते. 

प्रा. काटकर आणि कुमठेकर म्हणाले, की नेर्ली आणि अपशिंगे गावांचा परिसर इतिहासदृष्ट्या समृद्ध आहे. नेर्ली येथे मारुती मंदिरासमोर आणि अपशिंगे येथे जोतिबा मंदिराच्या मागे हे दोन गद्धेगाळ मिळाले. नेर्लीतील गद्धेगाळ हा पाच ओळींचा आहे. यावर गाढव आणि एका व्यक्तीचे चित्र शिल्पांकित केले आहे; तर वरील बाजूस सूर्य-चंद्र कोरले आहेत. अक्षरवाटिकेवरून आणि भाषाशैलीवरून हा गद्धेगाळ यादवकालीन असावा. 

अपशिंगे येथील गद्धेगाळावर गाढव आणि एका स्त्रीचे शिल्पांकन आढळून आले. गद्धेगाळ हा दोन्ही बाजूंना लिहिला आहे. एका बाजूला आडव्या सात ओळी आहेत; तर मुख्य बाजूवर चार ओळी असून, त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूस सूर्य-चंद्र काढले आहेत. मधील भागात "... आबदुळ मवाळ घराळही माफ' असे लिहिले आहे; तर त्याला लागून असलेल्या बाजूवर "... घाट माफ केळं... जो... विजे' असा मजकूर आहे. यावरून आदिलशाही राजवटीतील आबदुल नावाच्या कोणा अधिकाऱ्याने कोणते तरी कर माफ केले असावेत. गद्धेगाळ शिल्प सापडल्याने सामाजिक इतिहासाचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे. 

गद्धेगाळ म्हणजे काय? 
गद्धेगाळ ही शिलालेखांसारखीच लेखयुक्त शिल्पे आहेत. त्यावर नियम व आज्ञा मोडू नये, त्याचे पालन करावे, यासाठी शापवचनासारखी वाक्‍ये आणि गाढवावरून दिलेली शिवी आणि शिल्पांकनही असते. त्यामागे तर राजाज्ञा अथवा नियम मोडले तर कोणते परिणाम भोगावे लागतील, याचा इशारा असतो. त्यामुळे आज्ञा अथवा नियमभंग करण्याचे धारिष्ट्य कोणी करणार नाही, असा समज गद्धेगाळ लिखाणात असतो आणि ही आज्ञा गावातील सर्व नागरिकांच्या दृष्टीस पडावी, यासाठी असे गद्धेगाळ हे गावाच्या प्रमुख ठिकाणी ठेवले जात होते. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two sculptures found in Nerli-Upshing: Information of Yadav-Adilshahi decree revealed