सख्या बहिणींची शिरोळ तालुक्यात विहिरीत आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

दानोळी - जैनापूर (ता. शिरोळ) येथील हनुमाननगरमधील विहिरीमध्ये दोन सख्या बहिणींचे मृतदेह आज आढळून आल्याने परिसरासह तालुक्‍यात खळबळ उडाली. सौ. प्रियंका बाबासाहेब चौगुले (वय 25, रा. बेघर वसाहत नांदणी, ता. शिरोळ) व राजनंदिनी राजेंद्र उपाध्ये (16, रा. हनुमाननगर जैनापूर) अशी त्यांची नावे आहेत.

दानोळी - जैनापूर (ता. शिरोळ) येथील हनुमाननगरमधील विहिरीमध्ये दोन सख्या बहिणींचे मृतदेह आज आढळून आल्याने परिसरासह तालुक्‍यात खळबळ उडाली. सौ. प्रियंका बाबासाहेब चौगुले (वय 25, रा. बेघर वसाहत नांदणी, ता. शिरोळ) व राजनंदिनी राजेंद्र उपाध्ये (16, रा. हनुमाननगर जैनापूर) अशी त्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीवरुन ही घटना आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाचवेळी सख्या बहिणींनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

दोघी शनिवार दुपारपासून बेपत्ता होत्या. तीन दिवस त्यांचा शोध सुरु होता. आज (ता. 22) रोजी मृतदेह विहीरीत तरंगताना आढळला. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः जैनापूर येथील दानोळी रस्त्यावर हनुमाननगर वसाहत आहे. येथे जयसिंगपूर येथील राजीव गांधीनगरमध्ये राहत असलेले राजेंद्र उपाध्ये यांचे कुटुंब वर्षापूर्वी हनुमाननगर येथे राहण्यास आले होते. त्यांना स्वाती, प्रियंका, अक्षता व राजनंदिनी व मुलगा राहूल अशी एकुण पाच मुले आहेत. त्यातील प्रियंकाचा विवाह नांदणी येथे बाबासाहेब चौगुले यांच्याशी झाला आहे. त्या काही दिवसांपूर्वी माहेरी हनुमाननगर येथे आल्या होत्या. त्यांना तीन लहान मुली आहेत. 

राजनंदीनी हिचा दानोळीतील युवकाशी वर्षापूर्वी साखरपूडा झाला आहे. शनिवार (ता. 20) दुपारपासून प्रियंका चौगुले व राजनंदिनी उपाध्ये बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे कुटूंबीय त्यांचा शोध घेत होते. अखेर सोमवारी सकाळी हनुमाननगरजवळ असलेल्या एका विहीरीत दोघींचे मृतदेह तरंगताना आढळले. पोलिस पाटील अधिककुमार पाटील (रा. जैनापूर) यांनी जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती दिली. जयसिंगपूर पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. सहायक फौजदार सोमनाथ चळचुक तपास करीत आहेत. राजेंद्र उपाध्ये पुजा, वास्तुशास्त्र, कुंडली तयार करण्याबरोबरच जयसिंगपूर येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. या घटनेने उपाध्ये कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 

हेळसांड 
पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी प्रयत्न सुरू केले. जयसिंगपूर येथे महिला डॉक्‍टर नव्हत्या. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्‍टर रजेवर होत्या. त्यामुळे दोन्ही मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे शवविच्छेदनास नकार दिल्याने मिरज येथील रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two sisters suicide in Shirol Taluka in Jainapur