तासगाव-गोटेवाडी रस्त्यावर अपघातात पेड येथील दोन युवक ठार

गजानन पाटील
Monday, 18 January 2021

तासगाव - गोटेवाडी रस्त्यावर पुणदी फाट्याजवळ  झालेल्या अपघातात पेड (ता. तासगाव) येथील दोघे उच्चशिक्षित युवक ठार झाले

पेड (जि. सांगली)  : तासगाव - गोटेवाडी रस्त्यावर पुणदी फाट्याजवळ ताकारी कालव्याच्या कठड्यानजीक रस्त्याकडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला दुचाकीची जोरात धडक बसून अपघात झाला. त्यात पेड (ता. तासगाव) येथील दोघे उच्चशिक्षित युवक ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. अपघात शनिवारी रात्री दहाच्या सुमारास झाला. या घटनेमुळे पेड परिसरावर शोककळा पसरली आहे.

तेजस महिपती नलवडे (वय 24), राहुल शामराव माळी (वय 25) आणि अजय उत्तम माळी (वय 26) हे तिघे कामानिमित्त दुचाकीवरून तासगावला गेले होते. तेथून परतत असताना रात्री 9 ते 9.30 च्या दरम्यान पुणदी फाट्याजवळ गाडी बाजूपट्टीवरून घसरून रस्त्याकडेच्या कठड्याला आदळली. यामध्ये तेजस व राहुल या दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर अजय जखमी झाला. त्याच्यावर तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात असणाऱ्या ऊसतोड कामगारांनी अपघातग्रस्त युवकांना रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने थांबवून मदत केली. अपघातस्थळी उपस्थित लोकांना जखमी अजयने "आम्ही पेडमधील रहिवासी आहोत,' असे सांगितले. त्यानंतर उपस्थितांनी पेडमधील लोकांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. 

अपघाताची माहिती मिळताच पेडमधील युवक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. तासगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. 

एकुलती मुले हरपली; दोन्ही कुटुंबे उद्‌ध्वस्त 
पेड येथील तेजस महिपती नलवडे व राहुल शामराव माळी हे दोघेही उच्चशिक्षित असून आई-वडिलांना एकुलते होते. त्यांना अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून वडिलांनी मोलमजुरी करून चांगले शिक्षण दिले होते. तेजस नलवडे एमएस्सी असून रोहा (जि. रायगड) येथे कंपनीत नोकरीस होता; तर राहुल माळी हा इंजिनिअर असून पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरीस होता. हे दोन्ही युवक काही कामानिमित्त चार दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी आले होते. शनिवारी सायंकाळी तासगावला काही कामानिमित्त गेले होते. ते काम आटोपून परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हे दोन्ही युवक अपघातात ठार झाल्याने त्यांची कुटुंबे पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहेत. 

घराचे स्वप्न अपुरेच 
अपघातात ठार झालेले दोन्ही युवक अविवाहित होते. ते मोठ्या कष्टातून शिक्षण घेऊन चांगल्या कंपनीत नोकरीस लागले होते. आपल्या मूळ गावी पेडमध्ये त्यांनी घरांचे बांधकाम चालू केले होते. हे काम थोड्याच दिवसांत पूर्ण होणार होते. तोपर्यंतच त्यांचे अपघाताने निधन झाले. त्यांचे घराचे स्वप्न अखेर स्वप्नच ठरले. त्यांच्या निधनाने पेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths from Ped died in an accident on Tasgaon-Gotewadi road