‘उरमोडी’च्या प्रेरकाचा संघर्ष दुर्लक्षित

फिरोज तांबोळी
सोमवार, 3 डिसेंबर 2018

गोंदवले - उरमोडी प्रकल्पातून माण-खटावला पाणी आले अन्‌ श्रेयासाठी अनेकांच्या उड्याही पडल्या. मोठ्या गाजावाजात जलपूजनेही झाली. परंतु, या प्रकल्पाचे खरे प्रेरक गोंदवले बुद्रुकचे ज्येष्ठ कृषितज्ज्ञ वसंतराव पाटील व त्यांचा संघर्ष मात्र दुर्लक्षितच राहिला.

गोंदवले - उरमोडी प्रकल्पातून माण-खटावला पाणी आले अन्‌ श्रेयासाठी अनेकांच्या उड्याही पडल्या. मोठ्या गाजावाजात जलपूजनेही झाली. परंतु, या प्रकल्पाचे खरे प्रेरक गोंदवले बुद्रुकचे ज्येष्ठ कृषितज्ज्ञ वसंतराव पाटील व त्यांचा संघर्ष मात्र दुर्लक्षितच राहिला.

सातारा तालुक्‍यातील सिंचनासाठी परळी खोऱ्यात उरमोडी धरणाची निर्मिती करण्यात तत्कालीन आमदार आणि मंत्री (कै.) अभयसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला. एकूण पाणीसाठवण क्षमता २.९३ अब्ज घनफूट व उपयुक्त क्षमता २.७१ अब्ज घनफूट असणाऱ्या या धरणाला तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हिरवा कंदील दिल्याने या प्रयत्नाला १९८१ मध्ये यशही आले. याकाळात ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ वसंतराव पाटील यांनी या धरणातून माण- खटावला पाणी मिळू शकते, याचा सखोल अभ्यास केला.

माण तालुका उंचावर असल्याने व बारमाही वाहणाऱ्या नद्या नसल्याने या धरणातून लिफ्ट करून पाणी येऊ शकते व २३ गावांतील सुमारे ४० हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते, असा प्रस्ताव १९८९ मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यापुढे मांडला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कृष्णा खोरे पाणी मागणी कृती समिती स्थापन करून या योजनेतून पिंगळी तलावात पाणी सोडून आणखी ११ गावांचा पाणीप्रश्न मिटू शकतो, अशी सुधारित योजनेची मागणीही त्यांनी केली. या सुधारित योजनेलाही मुख्यमंत्री पवार व तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांनी १९९२ मध्ये मंजुरी दिली. 

अखेर १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते वडूज येथे या योजनेच्या कालव्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली.

टप्प्याटप्प्याने योजनेची कामे पूर्णत्वाकडे गेली. प्रत्यक्षामध्ये मात्र, या योजनेतून माणला उरमोडीचे पाणी मिळावे, यासाठी कृष्णा खोरे पाणी मागणी कृती समितीच्या वसंतराव पाटील, परशुरामशेठ शिंदे, नारायणराव पाटील, नारायणशेठ माने, वाघोजीराव पोळ, भीमराव पाटील, गोविंदराव पोळ यांनी मोठे योगदान दिले.

अखेर उरमोडीचे पाणी माण- खटावच्या पाटाने पळू लागले ते श्रेयवादाचा रंग घेऊन. आगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदारांवर छाप पाडण्यासाठी अनेक राजकीय नेते आपापल्या परीने पाणी मीच आणल्याचा दावा करून पाणीपूजनाचे सोहळ्यात दंग झाले आहेत. परंतु, आपण केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे प्रत्यक्ष पाहण्यासाठी हयात नसलेल्या वसंतराव पाटील या खऱ्या जलनायकाचा मात्र सर्वांनाच विसर पडला आहे.

Web Title: Uarmodi project water vasantrao patil