‘उडान’ची स्पर्धा रेल्वेशी

‘उडान’ची स्पर्धा रेल्वेशी

रेल्वेपेक्षा फक्त पाचशे रुपये प्रवासभाडे अतिरिक्त 

मिरज - नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत अडीच हजार रुपयांत कोल्हापूर-मुंबई प्रवासाची घोषणा केली आहे. यानिमित्ताने विमान प्रवासाचे भाडे रेल्वेच्या जवळ येऊन ठेपले आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्‍स्प्रेसचे प्रथमश्रेणी वातानुकूलित प्रवासाचे भाडे १ हजार ९६५ रुपये आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमान भाड्यात अवघा साडेपाचशे रुपयांचा फरक उरला आहे. विमानाच्या तिकिटाची रेल्वेशी स्पर्धा होणार आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतून मुंबईला जाण्यासाठी सध्या तरी पूर्ण क्षमतेने विमानसेवा नाही. परदेशी अतिथी, उद्योगांकडे येणारी शिष्टमंडळे, राजकीय नेते, कलाकार यांना खासगी विमान, हेलिकॉप्टर किंवा वाहनांचा वापर करावा लागतो. पाहुणे सर्रास रेल्वेच्या प्रथमश्रेणी वातानुकूलित सेवेचा वापर करतात. महालक्ष्मी आणि सह्याद्री एक्‍स्प्रेसचे प्रथमश्रेणी वातानुकूलितचे भाडे १ हजार ९६५ रुपये आहे. नव्याने घोषित झालेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे अडीच हजार रुपये भाडे स्वागतार्ह आहे. रेल्वे आणि विमानाच्या प्रवास भाड्यात फारसा फरकच राहिलेला नाही. कोल्हापुरातून महालक्ष्मी किंवा सह्याद्रीमधून मुंबईला पोचण्यासाठी साडेदहा तास लागतात; त्या तुलनेत कोल्हापूर-मुंबई विमान तासाभरात पोचते.

विमानतळावरील चेक इन आणि चेक आउटचा दोन तासांचा अतिरिक्त वेळ हिशेबात धरला तरीही तीन तासांत मुंबईत पोचता येते. सांगली आणि मिरजेत महिन्याला अनेक महत्त्वाचे अतिथी मुंबईसह देशभरातून व जगभरातून येतात. विशेषतः उद्योगांच्या भेटीसाठी येणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. सांगली-मिरज शहर विमान प्रवासाच्या आवाक्‍यात नसल्याने अनेक परदेशी पाहुणे येणे टाळतात. जिल्ह्यातील उद्योगांची वाढ मंदावण्याचे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. नव्या योजनेतून कोल्हापूर-मुंबई नियमित सेवा सुरू झाल्यास त्याचा काहीअंशी फायदा जिल्ह्याला होईल. सध्या कोल्हापुरातून दिवसा मुंबईला जाण्यापुरतीच सेवा उपलब्ध आहे. दिवसभर मुंबईतील कामकाज आटोपून कोल्हापूरला परतण्यासाठी संध्याकाळची विमानसेवा उपलब्ध नाही. कोल्हापूर विमानतळावर रात्री विमान लॅंडिंगची सोय नाही; त्यामुळे ही योजना कितपत व्यवहार्य ठरते, याची उत्सुकता असेल. 

खासगी विमान कंपन्यांकडून आगाऊ बुकिंग करणाऱ्यांना भरघोस सवलत देतात. पुणे ते बंगळूर खासगी विमानाचे तिकीट १३०२ रुपये आहे. या तुलनेत कोल्हापूर-मुंबई अंतर कमी असूनही अडीच हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये आणखी कपात होण्याची अपेक्षा आहे. 
 

जर्मन शिष्टमंडळाचा नकार
मिरज औद्योगिक वसाहतीतील एका फाउंड्रीला भेट देण्यासाठी जर्मनीतील शिष्टमंडळ येणार होते; पण सांगली-मिरजेत विमानाची सोय नसल्याने त्यांनी नकार दिला. या उद्योजकाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा किस्सा सांगितला. नुकत्याच मिरजेत संगीत महोत्सवासाठी येऊन गेलेल्या ख्यातनाम गायिका बेगम परवीन सुलताना यांनीही रेल्वे प्रवासातील ‘यातायात’ कथन केली. ‘रेल्वे इतकी हालत होती, की रंगमंचावर बसल्यानंतरही मला कोणी तरी ढकलत असल्याचा भास होत आहे,’ असे त्या म्हणाल्या. यावरून सांगली-मिरजेशी संलग्न विमानसेवेची गरज ध्यानी यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com