उडान फौंडेशनच्या महिला सदस्यांची केरळ पुरग्रस्तांना मदत

उडान फौंडेशनच्या महिला सदस्यांची केरळ पुरग्रस्तांना मदत

कोल्हापूर - पूराने केरळ उद्धवस्थ झाले, किती भयानक आहे, बापरे काय करत असतील येथील लोक, बिचारे... अशा प्रतिक्रिया फक्त सोशल मिडियावर पाठवून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्यांची कमी नाही. मात्र याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तयार झालेला महिलांचा उडान फौंडेशन ग्रुप त्याला अफवाद ठरला आहे. फेसबुक व्हॉटस्‌च्या माध्यमातून महिला सदस्यांनी मदतीचे आवाहन केले. बघता बघता धान्य, कपड्यासह नित्य उपयोगातील तीन टेंपो इतके साहित्य संकलित झाले. त्याची बांधाबांध करून केरळवासियांना पाठविण्यात येत आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेताना बाचणीतील भूषण शिवाजी लाड व त्याच्या मित्रपरिवाराला एक निराधार वयोवृद्धा भवानी मंडप परिसरात हातगाडीवर वडा मागून खाताना दिसायची. तिच्याकडे बघच आपण या घटकासाठी काहीतरी करायला हवे, असे त्यांना वाटू लागले. भूषणने त्यांचा वाढदिवस त्या आजीसोबत साजरा केला. तिला भरवलेला केक त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते.

मराठा क्रांती मोर्चा निमित्त भूषणही स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर महिला स्वयंसेविकांचे 13 ग्रुप कार्यरत होते. मराठा मोर्चा संपल्यानंतर एकत्रित आलेल्या या ग्रुपच्या माध्यमातून आणखी सामाजिक उपक्रम राबविले गेले पाहीजेत. याच प्रेरणेतून त्यांनी उडाण फौंडेशनची स्थापना केली. फेसबुक व व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून 195 महिला या ग्रुपमध्ये एकत्रित आल्या. चर्चा, गप्पा, टप्पा, पार्टीचे नियोजन याला छेद देत या ग्रुपने सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यास पंसती दिली. सोशल मिडीयाच्या मदतीने आतापर्यंत 51 निराधार लोकांचे पुर्नवसन, घरातून निघून गेलेल्या 22 वयोवृद्धांना पुन्हा घरी पोहचविण्यात आले. 

पुरामुळे केरळ उद्धवस्थ झाले. तेथील बांधवाना हात देण्यासाठी फौंडेशनने पुढाकार घेतला. ग्रुपचे सस्थापक भूषणसह सक्रीय सदस्या अनिता घाटगे, सोनाली रजपूत, माधुरी जाधव, मानसी शेटे, प्राजक्ता चव्हाण, मनिषा घाटगे, अफरिन नायकवडी, ललिता गांधी, रेखा उगवे आदींनी सोशल मिडीयावर यांनी दोन दिवसापूर्वी मदतीसाठीचे आवाहन केले. बघता बघता तब्बल तीन टेंपो मदत संकलित झाली. 800 किलो धान्य, दोन टेंपो कपडे, 23 बिस्किट पुड्याच्या बॉक्‍सह , सॅनिटरी नॅपकिन, साबण, टुट पेस्ट आदी साहित्य राजारामपुरीत राहणाऱ्या अनिता घाटगे यांच्या घरी वर्गीकरण महिला सदस्य वेळ मिळेल तशी करू लागले आहेत. ही मदत व्हाईट आर्मीच्या सहकार्यातून केरळवासियांपर्यंत उद्या (ता.24) पोहचविण्यात येणार आहे. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांची ओळख नसतानाही 195 महिला सदस्य उडान फौंडेशनशी जोडल्या गेल्या आहेत. समाजातील गरजू, निराधार आणि उपेक्षित घटकाना उपयोगी कसे पडू हा आमच्या ग्रुपचा ध्यास आहे. 

- अनिता घाटगे (उडान फौंडेशन, सदस्या) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com