येळवडे गावातील विद्यार्थ्यांना उदय गुरुजींचा लळा

येळवडे गावातील विद्यार्थ्यांना उदय गुरुजींचा लळा

राशिवडे बुद्रुक - मुळात शाळेच्या वेळेआधी एक तास त्यांचा वर्ग भरतो. वर्गात पाऊल टाकताच त्यांची नजर भिरभिरते, किती आहेत? कोण नाही? जे विद्यार्थी आले नाहीत, त्यांच्या घरी संपर्क होतो आणि ‘आज बाळ का आलं नाही...’ असा प्रेमळ प्रश्‍न विचारला जातो. वर्ग नेहमी गजबजलेला असावा, प्रत्येकानं शिकलंच पाहिजे, हा त्यांचा अट्टहास. येळवडे (ता. राधानगरी) प्राथमिक शाळेतील उदय शिवाजी पाटील यांच्या ज्ञानदानासाठी सुरू असलेल्या धडपडीची परिसरात चर्चा आहे. 

सकाळी अकरा वाजता शाळा भरते; परंतु कच्च्या मुलांची प्रगती व्हावी म्हणून गुरुजी साडेनऊला शाळेत येतात आणि दहालाच शाळा भरवतात. त्यांच्याकडे दुसरीचा वर्ग असून पटसंख्या ३४ आहे. शाळेत प्रवेश करताच त्यांची नजर वर्गात फिरते आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची दखल घेतली जाते. तत्काळ खिशातून मोबाईल काढून त्यांच्या पालकांशी संपर्क साधला जातो. केवळ शंभर टक्के हजेरी हे त्यांचं ध्येय नाही, तर मायेने विश्‍वासात घेऊन शिक्षण, अभ्यासात हयगय झाल्यास प्रसंगी कठोरताही त्यांच्यात आहे.

थंडीच्या दिवसांत शनिवारच्या सकाळच्या शाळेला मुलांना उन्हात बसवून हसत-खेळत शिक्षण देण्यात त्यांचा हातखंडा. त्यांच्या या पद्धतीचा मुलांनाही लळा लागला आहे. साधी राहणी आणि गावाकडच्या पालकांच्या परिस्थितीचा विचार करून सर्वांना सांभाळून घेण्याची त्यांची वेगळी लकब आहे.  

पदरमोडीतून सर्व काही
अनेक घरांमध्ये सव्वा ते साडेदहादरम्यान फोनची रिंग वाजली तर तो फोन उदयसरांचा पाल्याच्या चौकशीबाबत आहे, हे सर्वांनाच ज्ञात आहे. विद्यार्थी अनुपस्थित असेल आणि संपर्क होत नसेल तर गुरुजी थेट घरी पोचतात. विद्यार्थी आजारी असेल तर त्याची दखल घेतली जाते. हे सर्व पदरमोडीतून सुरू असते.

माझा पाल्य दुसरीच्या वर्गात शिकतो. रोज दहा वाजता त्याला शाळेत पाठवावे लागतेच. शिक्षणाबाबतची तळमळ, धडपड उदय सरांमध्ये दिसते. माझ्यासह इतर पालकांना त्यांचा अभिमान आहे. 
- सर्जेराव पाटील (
पालक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com