उदयनराजे म्हणतात, मी अजून संपलो नाही!

वृत्तसंस्था
Friday, 25 October 2019

आज हरलो आहे पण थांबलो नाही, 
जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही.

 

सातारा : महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. स्पष्ट बहुमत मिळविणार अशा अविर्भावात असणाऱ्य़ा भाजपला महाराष्ट्राच्या जनतेने चांगलाच धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांबद्दल कोणालाही आशा नसताना त्यांच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील हाय व्होलटेज लढतींपैकी एक म्हणजे भाजपचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील. लोकसभा पोटनिवडणुकीतील या लढतीत उदयनराजे जवळपास दीड लाखांच्या फरकाने पराभूत झाले. मात्र, पराभूत झालो असलो तरी अजूनही संपलो नाही अशा आशयाचे ट्विट त्यांनी आज केले आहे. 

Video : विजयानंतर रोहित पवार पत्नीसह विठ्ठलचरणी!

उदयनराजेंनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासूनच मतदारांमध्ये काहीसा नाराजीचा सूर निघू लागला होता. याचा प्रत्यय काल निकालादरम्यान आला. उदयनराजेंना तब्बल दीड लाखांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. पराभूत झाल्यावर आज त्यांनी ट्विट करत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत आणि अजूनही आपण संपलो नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

''आज हरलो आहे पण थांबलो नाही, 
जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही.

लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार.
सदैव आपल्या सेवेशी तत्पर,'' अशा आशयाचे ट्विट केले आहे. 

विधानसभा निवडणूकीत भाजपला उदयनराजेंसह अनेक मोठे धक्के बसले आहेत. पंकजा मुंडे, राम शिंदे, अनिल बोंडे , रोहणी खडसे अशा अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayan Raje tweets that he is not over yet after vidhan sabha election results