उदयनराजे बास्केटबॉल करंडकावर मोहोर कोणाची उमटणार आज ठरणार

सिद्धार्थ लाटकर 
बुधवार, 6 जून 2018

सातारा : राज्यस्तरीय युवा गटाच्या बास्केटबॉल स्पर्धेत प्रथमच साताऱ्याचा मुलांचा आणि मुलींचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. किल्ले अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्याशी होणाऱ्या या स्पर्धेत कोणता संघ खासदार उदयनराजे भोसले करंडकावर मोहर उमटविणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील तमाम बास्केटबॉल रसिकांना लागली आहे.

सातारा : राज्यस्तरीय युवा गटाच्या बास्केटबॉल स्पर्धेत प्रथमच साताऱ्याचा मुलांचा आणि मुलींचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. किल्ले अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्याशी होणाऱ्या या स्पर्धेत कोणता संघ खासदार उदयनराजे भोसले करंडकावर मोहर उमटविणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील तमाम बास्केटबॉल रसिकांना लागली आहे.

साताऱ्याच्या खेळाडूंच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी पेठापेठांमध्ये तयारी सुरु झाली आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंचे चाहते, कुटुंबीय, क्रीडाप्रेमींमध्ये मोठे उत्साहाचे आणि उत्सुकतेचे वातावरण आहे. अनेकांनी आपल्या संघाच्या विजया संदर्भात मोठमोठ्या पैजा ही लावल्या आहेत. तर पुणे आणि नागपूरकर मंडळींची पावले ही मंगळवारपासूनच (ता.पाच) गुरुवार पेठेतील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकूलात पडू लागली आहेत.

रणजीत अकादमी आणि सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या खासदार उदयनराजे भोसले करंडक राज्यस्तरीय युवा गटाच्या बास्केटबॉल स्पर्धेचा आज (बुधवार) समारोपाचा दिवस आहे. उपांत्य फेरीत साताऱ्याच्या मुलींच्या संघापाठोपाठ मुलांच्या संघाने ही मंगळवारी (ता. पाच) रात्री उशिरा झालेल्या सामन्यात जिगरबाज खेळ करुन नागपूर संघास 67-54 असे हरविले. मध्यंतरास नागपूर संघाकडे 27-22 अशी पाच गुणांची आघाडी होती. खेळाच्या तिसऱ्या सत्रात साताऱ्याच्या खेळाडूंनी आक्रमणात भर देत नागपूर संघावर 44-39 अशी पाच गुणांची आघाडी ठेवली. साताऱ्याच्या दिप अवकिरकरने यशराज राजेमहाडीक, तेजराज मांढरे यांच्या साथीने संघाचा गुणफलक हलता ठेवला. नागपूर संघातील सुमेध निपाणे (15) आणि मिहीर ढेबे (11) यांनी संघावरील आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस साताऱ्याने हा सामना 67-54 असा जिंकला. साताऱ्याच्या विजयात विवेक बडेकर, राज पाटील, कुमार घाडगे, यश पवार यांची ही मोलाचा वाटा ठरला.

मुलांच्या गटातील दूसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुणे संघाने मुंबई साऊथ ईस्ट संघावर 69-41 अशी मात केली. तसेच मुलींच्या गटातील दूसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नागपूर संघाने उत्तर मुंबई संघाचा 56-49 असा पराभव केला. नागपूरच्या सिया देवधरने 21, आभा लाडने नऊ , मुंबईच्या सुझॅन पिंटोने 24, वैभवी तावडेने 16 गुण नोंदविले. दरम्यान  स्पर्धेचा पारितोषिक वितरण समांरभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू व प्रशिक्षक अर्निका गुजर-पाटील यांनी दिली. 

अंतिम सामने
मुली  - सातारा विरुद्ध नागपूर (सायंकाळी साडे पाच)
मुले -  सातारा विरुद्ध पुणे (सायंकाळी सात)

Web Title: udayanraje basketball karandak final today