बदलतेय वारे अन्‌ शिडांची दिशाही!

उमेश बांबरे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पाटणमधील कार्यक्रमात पाठराखण केली. त्यामुळे उदयनराजेंसाठी राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मानले जाते. आता आगामी निवडणुकीसाठी साताऱ्यातील दोन राजांमध्ये मनोमिलनाचे वारे वाहणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. 

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पाटणमधील कार्यक्रमात पाठराखण केली. त्यामुळे उदयनराजेंसाठी राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मानले जाते. आता आगामी निवडणुकीसाठी साताऱ्यातील दोन राजांमध्ये मनोमिलनाचे वारे वाहणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी वेळोवेळी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे राष्ट्रवादीची सुरवातीपासूनच अडचण झाली होती. आता लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मागील सर्व काही विसरून त्यांच्याशी जुळवून घेतल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात उदयनराजेंनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आपल्या भाषणात सकारात्मक भूमिका ठेवून उल्लेख केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. काहींनी तर या दोन राजांचे मनोमिलन होणार असल्याच्या वावड्याही उठविल्या. सध्या राष्ट्रवादीत दोन गट आहेत. यातील एक गट उदयनराजेंनाच पुन्हा खासदारकीचे तिकुीट द्या, अशी भूमिका घेत आहे. तर, दुसरा गट उदयनराजे सोडून इतर कोणालाही उमेदवारी द्या, त्यांना आम्ही निवडून आणतो, असे सांगणारा आहे.

या दोन गटांच्या भूमिकेमुळे सातत्याने दोन राजांविषयी वावड्या उठत राहतात. पण, आनेवाडी टोलनाका वादानंतर दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यांची झालेली ससेहोलपट पाहता या सर्वांना आता दोन्ही राजे एकत्र यावेत, असे वाटू लागले आहे. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांची भूमिका पोषक ठरू लागली आहे. पाटणच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी उदयनराजेंची चिंता करू नका, त्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत, असे माध्यमांना सांगून त्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी उदयनराजेंना राष्ट्रवादीतूनच लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, त्यांच्याशी मतभेद असणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका आता महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. या दोघांनीही पक्षाध्यक्ष पवार जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल, असे सांगितले आहे. त्यामुळे पवारांनी घेतलेला निर्णय आता फलटण व सातारकरांना मान्य करावा लागणार आहे. उदयनराजेंची बदललेली भूमिका आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना फायद्याची ठरणार आहे. प्रश्‍न आहे तो आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या भूमिकेचा. यावरही खासदार शरद पवार निवडणुकीपूर्वी तोडगा काढतील, असे सांगितले जाते.

त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कोणाची कोणी अडचण करू नये, या हेतूने साताऱ्यातील दोन राजांमध्ये मनोमिलनाचे वारे वाहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रश्‍न राहणार तो फलटणचे राजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भूमिकेचाच.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपेक्षेप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांची केलेली पाठराखण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी दाखविलेली व्यासपीठीय जवळीक आणि त्याआधी दोन दिवस भाजपच्या साताऱ्यातील कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी रामराजे नाईक- निंबाळकर आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा केलेला सकारात्मक नामोल्लेख, या बाबी म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बदलू लागलेल्या वाऱ्यात शिडांची दिशाही बदलण्याचे काम सुरू झाल्याचे द्योतकच मानले जात आहे.

Web Title: Udayanraje Bhosale and Shivendrasinhraje Bhosale Politics