चिखलफेकीला अक्कल लागत नाही! - उदयनराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

सातारा - 'दुसऱ्याच्या अंगावर चिखलफेक करण्यासाठी अक्कल लागत नाही. स्वतः काही करायचे नाही आणि कोणी काही करीत असेल, तर त्याला आडवे यायचे. निवडणुकांच्या काळातील जाहीरनाम्यातील एकेक गोष्ट आम्ही पूर्णत्वास नेत आहोत. तुम्ही 42 वर्षांत काय केले आणि आम्ही काय करतोय हे एकदा समोरासमोर होऊन जाऊ द्या. नुसती दाढी वाढवून काही होत नाही,'' असा घणाघात आज खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केला.

आमदार भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार भोसले म्हणाले, 'विकासकामांत मी कधीही दुजाभाव केलेला नाही. माझी स्पर्धा कामाशी आहे. कारण नसताना माझ्यावर आरोप होताहेत. ते मला काही नवीन नाही. काकांमुळे तुरुंगवास भोगला. राजकारणात राजघराण्याचा फायदा तुमच्या वडिलांना आणि तुम्हांला झाला. मी तर संघर्षातून घडलो आहे.

बलात्काऱ्यांना बैठकीत घेऊन बसणारे तुम्ही इतरांना काय शासन करणार? खासदारकीला उमेदवार निवडताना पवार साहेब चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असे माझ्या बाबतीत विधान केले गेले. खरे तर तुमच्या संकुचित बुद्धीला व्यापकता कधी येणार? नुसते दाढी वाढवून चालत नाही. ठोशास ठोसा द्यावा लागतो. लोकांची कामेही करावी लागतात. तुम्ही काय कामे केली हे दाखवा. सातारा पालिकेच्या इतिहासात सध्या 700 कोटींची विकासकामे सुरू आहेत.''

आगामी काळात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, कास धरणावर हायड्रो इलेक्‍ट्रिक पॉवर प्रोजेक्‍ट या गोष्टी करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विरोधक अपुऱ्या माहितीवर टीका करीत असल्याची माहिती नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांनी दिली. ते म्हणाले, 'घंटागाड्यांचा ठेका जरी पुण्याच्या कंपनीने घेतला असला, तरी घंटागाड्या स्थानिकांद्वारेच चालविल्या जात आहेत. विरोधकांनी केवळ घंटागाड्यांच्या बिला संदर्भात माहिती दिली. वास्तविक त्यामध्ये टिपर, ट्रॅक्‍टर, कॉम्पेक्‍टॅर, मजूर यांच्याही खर्चाचा समावेश आहे.''

म्हणून म्हणतो संघटित व्हा...
उदयनराजे म्हणाले, 'औद्योगिक कारखाने यावेत यासाठी प्रयत्न सुरू असतो. सोना अलॉईज कंपनीला म्हणे मी खंडणी मागितली. तो स्थानिकांवर अन्याय करीत होता; पण जिल्ह्यातील स्वयंघोषित नेत्याने त्याला गुन्हा नोंदविण्यासाठी सांगितले. मला हेच आवडत नाही. कोणीही यावे आणि सातारा जिल्ह्याला टपल्या मारून जावे. म्हणून मी नेहमी म्हणतो संघटित व्हा. सर्व काही बारामतीला गेलं. खरे तर कऱ्हाड आणि बारामती जिल्हा होणार होता. साताऱ्याचे नाव पुसले गेले असते.''

Web Title: udayanraje bhosale shivendrasinh raje bhosale politics