उदयनराजेंचे सैन्य भाजपच्या तंबूकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

सातारा - पक्षीय राजकारणात कोणत्याच पक्षाकडून सन्मानाची वागणूक व पदे दिली जात नसल्याने नाराज झालेले खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा तालुक्‍यातील सुमारे 50 ते 60 निष्ठावंत समर्थक भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारी आहेत. त्यामध्ये काही आजी, माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

सातारा - पक्षीय राजकारणात कोणत्याच पक्षाकडून सन्मानाची वागणूक व पदे दिली जात नसल्याने नाराज झालेले खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा तालुक्‍यातील सुमारे 50 ते 60 निष्ठावंत समर्थक भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारी आहेत. त्यामध्ये काही आजी, माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून गेल्या दोन पंचवार्षिक निवडून येणारे "राष्ट्रवादी'चे खासदार उदयनराजे भोसले हे "राष्ट्रवादी'तून काडीमोड घेण्याच्या तयारीत असल्याचे सध्या तरी वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत त्यांनी कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही; पण "राष्ट्रवादी'ने उदयनराजेंना बाजूला ठेऊन जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती ठरविली आहे. त्यामुळे उदयनराजे समर्थकांत अस्वस्था आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच खासदारांनी राजधानी जिल्हा विकास आघाडीची घोषणा केली होती. आता याच आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणूक लढली जाणार हे निश्‍चित झाले आहे. आघाडी ही निवडणुकीपुरती राहणार आहे.

सुरवातीला भाजप, नंतर कॉंग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उदयनराजेंनी प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये ते फारसे रमले नाहीत; पण राष्ट्रवादीत ते चांगले रमले. त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे काही ना काही कारणांनी फिस्कटत गेले. त्यातूनच त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेण्यास सुरवात केली. उदयनराजेंच्या या भूमिकेचा फटका त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना बसला आहे. पक्षासोबत राहूनही कोणतीच आदराची वागणूक मिळत नाही. कोणत्या पदावर काम करण्याची संधी दिली जात नाही, अशा त्यांच्या तक्रारी आहेत. नाराज झालेले सातारा तालुक्‍यातील साधारण 50 खासदार समर्थक लवकरच भाजपच्या तंबूत जाणार आहेत. त्यासाठीची तयारी सध्या सुरू आहे. त्यामध्ये सातारा, कोरेगाव तालुक्‍यातील, कऱ्हाडच्या सीमेवरील काही निष्ठावंतांचा समावेश आहे.

खासदार समर्थक इतक्‍या मोठ्या संख्येने भाजपमध्ये जाणार असतील, तर भाजपला सातारा तालुक्‍यात मोठी ताकद मिळू शकते. भाजपच्या नेत्यांकडून अद्याप याबाबत दुजोरा मिळालेला नसला, तरी खासदार समर्थकांची तयारी सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी हा प्रवेश होण्याची शक्‍यता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. यामध्ये काही आजी- माजी पदाधिकारीही आघाडीवर आहेत.

उदयनराजेंच्या भूमिकेबाबत उत्सुकता
सातारा शहरात उदयनराजेंच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क मांडणारी चर्चा आहे. "राष्ट्रवादी'तून निवडून आल्यापासून उदयनराजे पक्ष मानत नाहीत. मी जनतेचा खासदार असल्याचे सांगत आहेत. अशा परिस्थितीत "राष्ट्रवादी'त नुकत्याच झालेल्या घडामोडीत उदयनराजेंना बाजूला ठेऊन निवडणूक लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. त्यामुळे उदयनराजे "राष्ट्रवादी'सोबत राहणार, की भाजपमध्ये जाणार याची उत्सुकता आहे.

Web Title: udayanraje bhosale supporter go to bjp