जाहीरनाम्यावरून उदयनराजे गायब 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

राष्ट्रवादीत खासदार बाजूला; "एकच ध्यास साताऱ्याचा चौफेर विकास'चा नारा 

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केलेल्या जाहीरनाम्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांना गायब केले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची ही रणनीती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंसाठी धोक्‍याची घंटा ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

कोणतीही निवडणूक असो खासदार उदयनराजे भोसले यांच्याशिवाय पक्षाचा प्रचार पूर्णच होऊ शकत नाही, अशी स्थिती होती. वेगळी स्टाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून लोकांत निर्माण केलेल स्थान लक्षात घेता उदयनराजेंचा विषय नेहमीच चर्चेचा राहिला आहे. सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊन उदयनराजेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या वेळी राष्ट्रवादीला लोकसभेत केवळ संख्याबळ वाढवायचे होते. या दरम्यानच्या काळात खासदार उदयनराजेंनी घेतलेल्या पक्ष व जिल्ह्यतील नेत्यांच्या विरोधातील भूमिकेमुळे सर्वांची अडचण झाली. जिल्हा बॅंक, जिल्हा परिषदेतील अविश्‍वास ठराव आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला पराभव. या सर्व धक्‍क्‍यांमागे खासदार उदयनराजेंची विरोधकांना मिळालेली साथ हेच कारण होते. खासदारांविषयी असलेली खदखद जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी शेंद्रे कारखान्यावर झालेल्या मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यापुढे मांडली. तेथे विधान परिषदेच्या निवडणुकीत "प्रसाद' घेतलेल्यांना खड्यासारखे बाजूला ठेवा, असे सूतोवाच शरद पवारांनी केले. त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उदयनराजेंविरोधात छुपा अजेंडा राबविण्यास सुरवात केली. 

याच दरम्यान, खासदारांनी राजधानी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक- निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली 

जिल्हा परिषदेची रणनीती ठरविली. या रणनीतीमुळे व विविध पक्षांनी स्वतंत्र लढण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे खासदारांची "राजधानी एक्‍स्प्रेस' बाजूला पडली. त्यामुळे त्यांनी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून केवळ सातारा तालुक्‍यातच उमेदवार उभे केले; पण यानंतरही "मी अजून राष्ट्रवादीतच आहे', असे सांगण्यास उदयनराजे विसरले नाहीत. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. या जाहीरनाम्यावर खासदार उदयनराजेंचे छायाचित्रच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतून उदयनराजे "हद्दपार' झाले की काय, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, या जाहीरनाम्यात "एकच ध्यास साताऱ्याचा चौफेर विकास' असा नारा देण्यात आला आहे.

Web Title: Udayanraje missing from Declaration