उजनीच्या पाण्याला हिरवा रंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

उजनीच्या जलाशयातील पाण्यावर हिरवा रंग आला असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे मच्छीमारांना या पाण्याचा त्रास होऊ लागला आहे. विशेष म्हणजे जलाशयावरून सुरू असलेल्या बहुसंख्य सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांद्वारे हेच प्रदूषित पाणी थेट पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

केतूर (जि. सोलापूर) - उजनीच्या जलाशयातील पाण्यावर हिरवा रंग आला असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे मच्छीमारांना या पाण्याचा त्रास होऊ लागला आहे. विशेष म्हणजे जलाशयावरून सुरू असलेल्या बहुसंख्य सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांद्वारे हेच प्रदूषित पाणी थेट पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

सोलापूर, पुणे, तसेच नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातील पाण्यावर हिरवा रंग आला आहे. डिकसळ पूल, भिगवन, डाळज, पडस्थळ, आजोती, कांदलगाव (ता. इंदापूर), कोंढार चिंचोली, खादगाव, रामवाडी, टाकळी, पोमलवाडी, केत्तूर एक, केत्तूर दोन, वाशिंबे, गोयेगाव, सोगाव, उमरड आदी ठिकाणी जलाशयाच्या पाण्यावर हिरवा रंग आलेला दिसून येत आहे. धरणाच्या प्रदूषित होणाऱ्या पाण्यावर देशी- विदेशी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वारंवार सांगितले आहे. असे असूनही जलाशयातील पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे बिनधास्तपणे पिण्यासाठी वापरले जात आहे. या पाण्याशी संपर्क आल्यावर अंगाला खाज सुटत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढूनही याकडे सरकारचे किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे. उजनी जलाशयात पुणे जिल्हा परिसरातील मैला, सांडपाणी, तसेच रासायनिक कारखान्यांतील निरुपयोगी टाकाऊ रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणावर पाण्याबरोबर येतात. यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या प्रदूषणामुळे जलाशयातील वनस्पती, तसेच इतर जलचरांवरही परिणाम होत आहे.

उजनी जलाशयाचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाले असल्याने मच्छीमारीसाठी पाण्यात उतरल्यानंतर पायाला खाज सुटत आहे. 
- लक्ष्मण नगरे, मच्छीमार, केतूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ujani dam water colour green pollution