उजनीतील पाणी यंदा इतके लवकर कसे कमी झाले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

केत्तूर - सोलापूरसह पंढरपूर, सांगोला शहरांना पिण्यासाठी पाणी म्हणून उजनी जलाशयातून भीमा नदीद्वारे मंगळवारी (ता. १५) पुन्हा एकदा पाणी सोडले जाणार असल्याने करमाळा, इंदापूर, कर्जत तालुक्‍याच्या उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची धडधड मात्र वाढली आहे. यंदा इतके लवकर पणी कसे कमी झाले, असा प्रश्‍न विचारला जात आहे. पाण्याचे नियोजन नसल्याने हे घडत असल्याची चर्चा आहे.  

यंदा १०९ टक्के पाणीसाठा झालेल्या उजनी जलाशयातून ऑक्‍टोबर महिन्यात सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने उजनीचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन तो पावसाळ्याला सहा महिने उर्वरित असताना ४० टक्‍क्‍यांवर गेला. आता यापुढे येणारा कडाक्‍याचा उन्हाळा कसा जाणार? सोलापूरसाठी भीमा नदीद्वारे पाणी सोडल्याने उजनी जलाशयाचा पाणीसाठा मात्र मृतसाठ्यात पोचणार आहे. त्यामुळे उजनी लाभक्षेत्राचा भाग वाळवंट होणार यात शंका नाही.

पिण्याकरिता पाणी देण्यासाठी कोणाचा विरोध नाही, परंतु ते पाणी पाइपलाइनद्वारे नेणे गरजेचे असताना ते नदीद्वारे सोडले जात असल्याने या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात मोठी घट होते. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली राजकारण्यांच्या शेतीसाठी या पाण्याचा वापर होत असल्याचे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे. यापुढे नदीद्वारे पाणी सोडू नये, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता खाली पाणी सोडल्याने उजनी जलाशयावरील जवळजवळ सर्वच पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसणार असल्‍याचा विचार होणे गरजेचे आहे. शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी पाहिजे, परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना यामुळे बंद पडणार आहेत त्याचे काय? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. उजनीच्या पाण्याचा विचार करताना प्रथम मूळ धरणग्रस्त, उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी, नागरिक यांचा विचार होणे महत्त्वाचे असताना हा विचार होताना दिसून येत नाही.

Web Title: Ujani Dam Water Decrease