महिन्यात 30 टक्के पाणी झाले कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

उजनी धरण; सोलापूरला सोडले 17 टीएमसी पाणी
सोलापूर - उजनी धरणातून मागील एक महिन्यापासून पाणी सोडले जात आहे. हे पाणी सोडताना कालवा, बोगदा व नदीचा वापर करण्यात आला आहे. एक महिन्याच्या कालावधीत धरणातील जवळपास 30 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून पाणी सोडल्यामुळे धरणातील 17 टीएमसी पाणी कमी झाले आहे.

यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले होते. धरण भरल्यामुळे परिसरात व पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ या तालुक्‍यामध्ये उसाच्या लागवडीमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे पाणीवाटप नियोजनाची बैठक झाली होती. त्या वेळी सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली. मात्र, मागील महिन्यात सोलापूर शहराला पाणी सोडण्याच्या विषयावर बरेच राजकारण झाले. कॉंग्रेस व भाजपच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या विषयावर आरोप-प्रत्यारोप झाले. शहरात दोन-दोन मंत्री असूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याची टीका कॉंग्रेसच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी केली. सोलापूरकरांवर पाणी मागण्याची वेळ येऊ देणार नसल्याचे पालकमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले.

यानंतर उजनी धरणातून 15 डिसेंबरला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात केली. सुरवातीला कमी असलेला प्रवाह टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. त्यानंतर बोगद्यातूनही पाणी सोडले जाऊ लागले. कालवा व बोगद्यातून पाणी सोडल्यानंतर ते नदीमध्ये कधी सोडणार, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला. त्यानंतर दोन-तीन दिवसांत वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले गेले. यामुळे पाणीसाठा जवळपास 30 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे.

उजनी स्थिती
15 डिसेंबर - एकूण पाणीसाठा-118 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा-54.41 टीएमसी, उपयुक्त पाण्याची टक्केवारी-101.56 टक्के
16 जानेवारी - एकूण पाणीसाठा-101 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा-38 टक्के, उपयुक्त पाण्याची टक्केवारी-70.92 टक्के

Web Title: ujani dam water release to solapur