अनिकेत कोथळेचा खून पुर्वनियोजित - उज्ज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सांगली - शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत ठार झालेला अनिकेत कोथळे याचा खून हा कस्टोडियल मर्डर नसून तो पुर्वनियोजित खूनच आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल शिंगटे आणि झाकीर
पट्‌टेवाले यांना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज केला. जामीनअर्जावरील निर्णय 18 तारखेस होणार आहे.

सांगली - शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत ठार झालेला अनिकेत कोथळे याचा खून हा कस्टोडियल मर्डर नसून तो पुर्वनियोजित खूनच आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल शिंगटे आणि झाकीर
पट्‌टेवाले यांना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज केला. जामीनअर्जावरील निर्णय 18 तारखेस होणार आहे.

राज्यात खळबळ माजवणारे अनिकेत कोथळे खून प्रकरणात आज दोन संशयित आरोपी मोबाईल बेकर चालक राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्‌टेवाले यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. सरकार आणि बचाव पक्षाचे
युक्तीवाद आज पुर्ण झाले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारतर्फे युक्तीवाद केला. तर बचाव पक्षातर्फे अॅड. दिपक शिंदे, विकास पाटील आणि किरण शिरगुप्पे यांनी युक्तीवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक तीन श्रीमती एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर सुनावणी झाली.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोन्ही संशयितांच्या जामीनास विरोध केला. ते म्हणाले, या घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याने दिलेल्या जबाबानुसार शिंगटे आणि पट्‌टेवाले यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग दिसून येतो. हा पुर्वनियोजित खून होता. त्यामध्ये दोघांचाही सहभाग
असल्याचे दिसते. बचाव पक्षाचे वकील साक्षीदारांच्या जबाबातील त्रुटींचा आधार घेऊन जामीन मागत आहेत. त्यामुळे अशा बाबींचा विचार करु नये, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. बचाव पक्षाने या
घटनेतील कागदपत्रे आणि कॉल डिटेल्सची मागणी केली. मात्र ती देण्यासही श्री. निकम यांनी विरोध केला.

आरोपींच्या वकिलांनी दोन्ही संशयितांचा प्रत्यक्ष खुनाच्या घटनेत सहभाग नव्हता असा युक्तीवाद केला. यामध्ये राहुल शिंगटे हा मोबाईल बेकरचा चालक आहे. तो गाडीतच होता. अनिकेत कोथळेला मारहाण होताना तो उपस्थित नव्हता
असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला. तर पट्‌टेवाले याने मारहाण केलेल्या अनिकेत कोथळेच्या अंगावर कपडे घातले. त्याशिवाय त्याचा घटनेत सहभाग नव्हता असा युक्तीवाद पट्‌टेवालेच्या वकिलांनी केला. या दोन्ही वकिलांनी संशयित आरोपींना जामीन मिळण्याची मागणी केली. यावेळी न्यायालयात या घटनेतील सर्व संशयित आरापींनाही हजर करण्यात आले होते.

Web Title: Ujjwal Nikam comment on Aniket Kothale Murder case