जिल्ह्यात एक लाख सहा हजार कुटुंबांना गॅस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

- सोलापूर जिल्ह्यात एक लाख सहा हजार कुटुंबांना गॅस
- उज्ज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी

सोलापूर : दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकासाठी सवलतीच्या दरात व सुलभपणे गॅस कनेक्‍शन उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हाती घेतली. 1 मे 2016 रोजी सुरू झालेल्या या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख सहा हजार 741 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना फक्त 100 रुपये भरून तत्काळ गॅस कनेक्‍शन दिले जाते. या योजनेच्या लाभार्थींची यादी संबंधित पेट्रोलियम कंपन्यांना देण्यात आली असून कंपन्यांच्या वतीने ही योजना राबविली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने केरोसिनच्या मागणीत कमालीची घट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास अडीच लाख लिटर केरोसीनची मागणी घटली आहे. सोलापूर शहर केरोसीन मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. 

आकडे बोलतात.... 
उज्ज्वला योजनेचा लाभ देणाऱ्या कंपन्या 

भारत पेट्रोलियम कंपनी : 65 हजार 364 लाभार्थी 
हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी : 32 हजार 611 लाभार्थी 
इंडियन ऑइल कार्पोरेशन : 8 हजार 706 लाभार्थी 
(लाभार्थींची स्थिती 25 ऑक्‍टोबर 2018 ची) 

जिल्ह्यातील जे कुटुंब केरोसीन घेतात अशा कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना "उज्ज्वला'सह अन्य योजनेतून गॅस कनेक्‍शन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील केरोसीन घेणाऱ्या कुटुंबांना गॅस देऊन केरोसीन मुक्त सोलापूर जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन आखण्यात आले आहे. येत्या काळात नगरपरिषद हद्दीत ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे. त्यानंतर गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. - स्वप्नील रावडे, सहायक पुरवठा अधिकारी, सोलापूर

Web Title: Ujwala Gas Schenme reach to one lakh six thousand families In Solapur District