कळंबावासीयांच्या नशिबी दुर्गंधीयुक्त पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

उपसाबंदीला महापालिकेचाच ठेंगा - कळंबा तलावातील पातळीतही मोठ्या प्रमाणात घट
कळंबा - कळंबा तलावातून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उपसाबंदी केली आहे, तरीही कळंबा गाव आणि महापालिका तलावातून पाणी उपसा करत आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी घटत चालली आहे.

उपसाबंदीला महापालिकेचाच ठेंगा - कळंबा तलावातील पातळीतही मोठ्या प्रमाणात घट
कळंबा - कळंबा तलावातून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उपसाबंदी केली आहे, तरीही कळंबा गाव आणि महापालिका तलावातून पाणी उपसा करत आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी घटत चालली आहे.

तसेच पाण्यालाही दुर्गंधी सुटली आहे. तलावातील पाण्याच्या पातळीत मोठी घट होत असल्याने कळंबा ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा उपसाबंद करावा, अशी सूचना महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली होती; पण ही सूचना खुद्द महापालिकेनेही अंमलात आणलेली नाही. तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था न करता महापालिका पण या तलावातून उपसा करून शहरातील काही भागाला पाणीपुरवठा करत आहे. जर ग्रामपंचायतीने निर्णय मान्य करून उपसा बंद केला, तर गावातील नागरिकांना पाणी कसे द्यायचे, हाही प्रश्‍न आहेच?     

कळंबा तलावाची पाणी साठवण क्षमता अर्धा टीएमसी आहे. गेल्या वर्षी तलावातील गाळ काढला आहे. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार
पावसामुळे तलाव ओसंडून वाहिला होता. ऑगस्टमध्ये २६ फुटांवर असणारी पाण्याची पातळी आता अवघ्या ९ फुटांपर्यंत आली आहे. तलावातून सध्या कळंबा गावासह महानगरपालिकेच्या कळंबा फिल्टर हाऊससाठी पाणी उपसा केला जातो. सध्या कळंबा गावात एक हजार नळ कनेक्‍शन आहेत.

त्यासाठी  दहा लाख लिटर पाणी उपसा केला जात होता, तर महानगरपालिकेकडून ४ एमएलडी पाण्याचा उपसा केला जात होता. रोज होणारा पाणी उपसा आणि तलावातील गाळ काढण्याच्या कामावेळी झालेल्या त्रुटीमुळे सध्या तलावातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. नुकतीच पाणीपुरवठा विभागाने कळंबा ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करून तलावातून पाणी उपसा बंद करावा, असा आदेश होता. सध्या एक  दिवसआड गावाला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि दुर्गंधीयुक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत.

कळंबा गावाला तलाव सोडून दुसरा कोणताही पाण्यासाठी पर्याय नाही. जर पाणी उपसा बंद केला नाही, तर तलावातील पाणी संपणार आहेच. तसेच तलावातील जलचरांनाही धोका निर्माण होणार आहे. 

यापूर्वी कळंबा गावाला पुईखडी जलशुद्धीकरण केद्रांतून  रोज ४ लाख लिटर पाणीपुरवठा केला जात होता. त्याच पद्धतीने पाणीपुरवठा महापालिकेने करावा, अशी मागणी कळंबा ग्रामपंचायतीने महापालिकेकडे केली आहे; पण कळंबा ग्रामपंचायतही महापालिकेचे मागील बिलापोटी ८ लाख देणे बाकी होते. त्यातील ४ लाख रुपये महापालिकेकडे ग्रामपंचायतीने भरले आहेत. उर्वरित ४ लाख दोन हाप्त्यात भरले जाणार आहेत.  
-विश्‍वास गुरव, माजी सरपंच 

जर महापालिकेने लवकर निर्णय घेऊन पाणीपुरवठा केला नाही, तर कळंबा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होईल. त्यामुळे महापालिकेनेही तलावातील पाणी उपसा बंद करावा. नागरिकांना चांगले पाणी द्यावे, हीच अपेक्षा आहे. 
-दत्तात्रय हाळदे, माजी उपसरपंच

Web Title: uncleaned water in kalamba lake