अंबाबाई मंदिराजवळील अस्वच्छता झाली व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे, की अंबाबाई मंदिराकडे जाणारा हा एक मुख्य रस्ता. देशभरातून हजारो भाविक रोज इथं येत असतात. सकाळी देवदर्शनाला निघाले की मंदिर परिसरातील बहुतेक सर्व रस्त्यावर अस्वच्छतेचे दृश्‍य पर्यटकांना दिसते. 

कोल्हापूर - अंबाबाई मंदिर परिसरातील गाडगेबाबा महाराज पुतळा व जोतिबा रोडवरील अस्वच्छतेबाबत काल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त झाली. फूल विक्रेत्यांसह विविध विक्रेते या जागेवर व्यवसाय करतात; मात्र ती जागा पुन्हा स्वच्छ करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती का बाळगावी? त्यांना जबर दंडच ठोठावायला हवा, असा सूरच सोशल मीडियावर व्यक्त झाला. येथील अस्वच्छतेचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दुपारी महापालिकेने त्याठिकाणची स्वच्छता केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे, की अंबाबाई मंदिराकडे जाणारा हा एक मुख्य रस्ता. देशभरातून हजारो भाविक रोज इथं येत असतात. सकाळी देवदर्शनाला निघाले की मंदिर परिसरातील बहुतेक सर्व रस्त्यावर अस्वच्छतेचे दृश्‍य पर्यटकांना दिसते. 

शहरातील एक नागरिक म्हणून अशी अस्वच्छता पाहिल्यानंतर लाज वाटते. आसपासच्या गावागावांतून कित्येक विक्रेते मंदिर परिसरात विविध वस्तू विकतात. त्यातून घर चालवतात. मात्र, ज्या जागेवर बसून आपण विक्री करतो, ती जागा किमान स्वच्छ करून ठेवावी, इतकीही पर्वा त्यांना नसेल तर खरंच त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगावी का? 

त्यांना दंड ठोठावायला हवा. सरकारी कर्मचारी नंतर येऊन स्वच्छता करतील, या बेफिकीर मनोवृत्तीतून हे घडत आहे. या मनमानीपणासाठी सुरवातीला एक-दोन वेळा प्रबोधन जरुर करायला हवं, मात्र परत बेफिकिरी दाखवतील त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. या परिसरातील नागरिकांनी, दुकानदारांनी सर्वांनी मिळून काही पावलं उचलायला हवीत, ज्यायोगे सकाळी मंदिर परिसर देखणा व स्वच्छ राहील.

या परिसरात रोज दोन वेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. सकाळी आणि सायंकाळी अशा सत्रांत ही मोहीम असते. मात्र, सणासुदीच्या काळात येथे कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. महापालिका नेहमी येथे साफसफाई करीत असतेच. पण, बेशिस्तपणे कचरा टाकून जाणाऱ्यांनी आता काळजी घ्यायला हवी. अन्यथा प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील. 
- जयवंत पवार, मुख्य आरोग्य निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The uncleanness near the Ambabai Temple viral on social media