उंडाळकर गटाचे शिलेदार भाजपच्या दावणीला...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कऱ्हाड - जातीयवादी पक्षाचा बिमोड करून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बचावचा नारा देणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते भाजपकडे झुकले आहेत. दक्षिणेत स्थिर होण्यासाठी माजी आमदार उंडाळकर गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उत्तर मतदारसंघातील त्यांच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे काका गटाचे कार्यकर्ते भाजपच्या दावणीला लागले आहेत. त्यामुळे उत्तर मतदारसंघात भाजपची ताकद वाढत आहे.

कऱ्हाड - जातीयवादी पक्षाचा बिमोड करून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बचावचा नारा देणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते भाजपकडे झुकले आहेत. दक्षिणेत स्थिर होण्यासाठी माजी आमदार उंडाळकर गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उत्तर मतदारसंघातील त्यांच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे काका गटाचे कार्यकर्ते भाजपच्या दावणीला लागले आहेत. त्यामुळे उत्तर मतदारसंघात भाजपची ताकद वाढत आहे.

दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व करताना माजी आमदार उंडाळकर यांनी उत्तर मतदारसंघातही गटबांधणी केली. पर्यायाने उंडाळकरांचे नेतृत्व नेहमीच तालुक्‍याचे नेतृत्व म्हणून वाढत गेले. त्यांचा उत्तरेतील गट विधानसभेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही निर्णायक ठरत आला. नेहमी बेरजेचा विचार करत दक्षिणसह उत्तरमध्येही आपली भूमिका काय असणार, याची काळजी घेत त्यांनी गट वाढविला.

२००४, २००९ व २०१४ च्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून आला. २००९ मध्ये अतुल भोसले यांनी उत्तरेवर स्वारी करत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला. त्यावेळी उत्तरेत सारे सैन्य काका गटाचेच त्यांच्यासोबत होते. २०१४ मध्येही त्या गटाने सोयीस्कर भूमिका घेतल्या. वास्तविक श्री. उंडाळकरांचा आदेश होताच. २०१४ मध्ये प्रत्यक्ष श्री. उंडाळकरांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र, त्यांची कऱ्हाड उत्तरेतील पकड ढिली होत गेली. श्री. उंडाळकरांनी कऱ्हाड दक्षिणमध्ये लक्ष घालून तेथे गट बळकट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांचे उत्तरच्या गटाकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम दिसू लागला आहे. अर्थात हा दुर्लक्ष झाल्याचा परिणाम आहे की, राजकारणाचा नवा सारीपाट आहे, हे वेळच ठरवेल. तूर्त तरी भाजप संपर्क वाढलाय हे नक्की. 

भाजप जातीयवादी पक्ष हरला पाहिजे. तो समाजात दुही निर्माण करतो आहे, अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या उंडाळकरांच्या उत्तरेतील कार्यकर्त्यांसह पहिल्या फळीतील नेतेही भाजपच्याच संपर्कात आहेत. मसूर, पाल, उंब्रज, चोरे, कोपर्डे हवेलीसह अनेक गावांत काका गट आहे. त्या गटातील बहुतांशी कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तरेतील काका गटाशी संपर्क वाढविला आहे. त्यांनी प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क साधून ती किमया साध्य केली आहे. भाजपतर्फे मनोज घोरपडे जरी जाहीर झाले असले तरी धैर्यशील कदम यांच्याशीही त्यांनी संपर्क वाढविला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांपैकी एकाला काका गट पाठिंबा देवून भाजपच्या वाटेवर निघाला आहे. वास्तविक प्रत्येक विधानसभा निवडणुकीत काका गटाने उत्तरेत वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. यंदा चक्क भाजपच्याच हातात हात देण्याच्यादृष्टीने त्यांची पावले पडली आहे. मसूरसह काही भागात तो प्रवेश निश्‍चित झाला आहे. चोरेसह काही भागातील प्रवेश दोन दिवसांत होणार आहेत. वास्तविक राजकारणात कोणी दीर्घ काळासाठी विरोधक नसतो व कोणीही समर्थक होवू शकत नाही, या उक्तीप्रमाणे उंडाळकर गटाने प्रत्येक निवडणुकीत भूमिका घेतली आहे, असेच म्हणावे लागेल.

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात बाबा-काका मनोमिलन? 
कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात स्थानिक पातळीवर माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यात विधानसभा निवडणुकीत थेट लढत झाली. श्री. चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी होती. तर श्री. उंडाळकर अपक्ष म्हणून रिंगणात होते. एवढे असूनही काका गट सध्या चव्हाण गटाशी मनोमिलनाच्या मानसिकतेत आहे. अनेक कार्यक्रमात काका गटाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील व थेट श्री. चव्हाण एकत्रित दिसले. मलकापूर पालिकेतही दोन्ही गट एकत्रित आहेत. त्यामुळे विधानसभेत काय होणार, याकडे लक्ष लागून आहेच. मात्र, सध्या तरी त्या गटाची पावले ‘मनोमिलना’कडेच आहेत. हे नक्की...

Web Title: Undalkar Group BJP Politics Vilasrao Undalkar