इस्लामपूरच्या भुयारी गटार योजनेचे ई-भूमिपूजन 

इस्लामपूरच्या भुयारी गटार योजनेचे ई-भूमिपूजन 

इस्लामपूर - केंद्र व राज्य शासनातर्फे इस्लामपूर शहरासाठी मंजूर झालेल्या 69.42 कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचा ई-प्रारंभ आज दिमाखात पार पडला. राज्यातील शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. 

मुंबई येथील वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, मंत्री सुनील तटकरे, आमदार विनायकराव जाधव, पद्माकर पाटील, राज्य प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील एकमेव इस्लामपूरच्या भुयारी गटर योजनेचा समावेश त्यात होता. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी या वेबकास्टद्वारे झालेल्या ई-भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेबकस्टद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, "नागरीकरण हे आव्हान नाही तर संधी समजून सरकार काम करत आहे. मोठ्या इमारती, सुंदर रस्ते, उद्यान म्हणजे विकास नव्हे; तर पुरेसा पाणीपुरवठा, पाण्याचा योग्य प्रकारे निचरा आणि त्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणारी यंत्रणा हाच खरा विकास म्हणता येईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहोत. पालिकांनी विकास आराखडा कार्यान्वित करून मूलभूत सुविधा निर्माण करून देण्याला प्राधान्य द्यावे. शहर स्वच्छतेबरोबर गटारमुक्त करण्यावर भर आहे. नगररचना विभाग अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न आहेत. प्रशासन पारदर्शी असेल. स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम शहरांना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यातून विकासाला निधी दिला जाईल.'' 

पालिकेच्या कामाची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांची आहे. दर्जेत कोणतीही तडजोड होणार नाही. दर्जा, गुणवत्ता आणि पारदर्शी कामकाज याला सरकारचे प्राधान्य राहील. सभापती रामराजे निंबाळकर यांच्याशी फडणवीस यांनी फेसटॅगच्या माध्यमातून संवाद साधला. सर्वांनी तो ऑनलाइन अनुभवला. राजारामबापू पाटील नाट्यगृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, नगरसेवक विक्रम पाटील, अमित ओसवाल, शकील सय्यद, कोमल बनसोडे, प्रदीप लोहार, मंगल शिंगण आदी या वेळी उपस्थित होते. 

विरोधकांची पाठ 
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष, सभापती शहाजी पाटील आणि उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील हे दोघे वगळता राष्ट्रवादीच्या गटनेते व इतर नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या दोघांनाही मनोगत व्यक्त करायला लावण्यात आले. दादासाहेब पाटील यांनी योजना पूर्णत्वाची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे सांगितले. विक्रम पाटील यांचे भाषण झाले. 

"योजना वेळेत, गुणवत्तापूर्ण केली जाईल. हे राज्य कोणत्या दिशेने जाणार आहे ते आजच्या कार्यक्रमामुळे दिसले आहे. शहराचा संतुलित विकास साधू.' 

निशिकांत पाटील, नगराध्यक्ष. 

"मागील आणि विद्यमान सदस्यांच्या पाठपुराव्याने आज चांगल्या योजनेचा प्रारंभ झाला. मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांचे आभार.' 

शहाजी पाटील, पाणी पुरवठा सभापती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com