कोल्हापूर रस्त्यावरील ड्रेनेज तुंबल्याने गावभाग, मंडई परिसराचे तळे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

शहरातील मारुती चौक, शिवाजी मंडई, रिसाला रस्ता, राजवाडा चौक परिसरातील भूमिगत गटारे तुंबली आहेत. पंपिग स्टेशनच्या कामामुळे सध्या आखाड्यापासून थेट भोबे गटारातून पाणी सोडले जात आहे. ही वाहिनी तुंबल्याने भारतनगरातील दहा घरांमध्येही गटाराचे पाणी शिरले आहे.

सांगली - येथील कोल्हापूर रस्त्यावरील जोतिरामदादा आखाड्यातील पंपिग स्टेशनकडे जाणारी वाहिनी तुंबल्याने शहरातील मारुती चौक, शिवाजी मंडई, रिसाला रस्ता, राजवाडा चौक परिसरातील भूमिगत गटारे तुंबली आहेत. पंपिग स्टेशनच्या कामामुळे सध्या आखाड्यापासून थेट भोबे गटारातून पाणी सोडले जात आहे. ही वाहिनी तुंबल्याने भारतनगरातील दहा घरांमध्येही गटाराचे पाणी शिरले आहे. महापालिकेने आज दुपारपासून डिझेल पंप बसवून पाणी उपसा सुरु ठेवला आहे. यानिमित्ताने शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजले आहेत याचेही दर्शन झाले. 

शहरातील गावभाग, शिवाजी मंडई, राजवाडा परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. मारुती चौकातील शिवाजी पुतळ्याच्या परिसराचे तर अक्षरक्षः तळे झाले आहे. काल सकाळपासून पाणी मंदगतीने पुढे सरकत आहे. टपाल कार्यालय, शिवाजी पुतळा, शिवाजी मंडई या भागातील सर्व दुकाने सध्या बंद आहेत. या गटाराच्या पाण्याशेजारीच सकाळी भाजी विक्री सुरु होती. तेथे कोपऱ्यावर कचऱ्याचे कंटेनर ओसंडून वाहत होते. दुपारी बाराच्या सुमारास ते उचलण्यात आले. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला. संपुर्ण भाजी मंडईतील व्यवहार ठप्प होते. तिथल्या महापालिका गाळ्यांमधील दुकानदारांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली. 

drains water

दरम्यान कालपासून पालिकेची यंत्रणा गटार मोकळी करण्यासाठी कागदोपत्री राबत होती. कोल्हापूर रस्त्यावरील कबाडे हॉस्पिटलजवळ गटाराचा मुख्य प्रश्‍न आहे. तो सोडवण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र तातडीची उपाययोजना म्हणून तेथे पंप बसवून ड्रेनज उपसणे. त्यासाठी आवश्‍यक असा वीज पुरवठा मिळवणे पालिका यंत्रणेपुढील आव्हान आहे. कारण यासाठी सुमारे 25 ते 30 अश्‍वशक्तीचे विद्युत पंपांना पुरेसी अशी वीज द्यायची तर त्यासाठी स्वतंत्र अशी जादा क्षमतेची वीज वाहिनी गरजेची आहे. त्यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला आयुक्तांनी कालच मान्यता दिली मात्र त्यासाठी रक्कम भरून प्रत्यक्षात काम सुरु होणे दिव्य होते. त्यावरही तातडीचा उपाय म्हणून डिझेल पंपाद्वारे उपसा करण्याचा पर्याय नगरसेवक शेखर माने यांनी पुढे केला. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शीतल उपाध्ये यांनी तत्परतेने कार्यवाही करीत भारतनगरजवळ दुपारी एकच्या सुमारास पंप सुरुही केले. सायंकाळपर्यंत ड्रेनेज मोकळे होईल असे श्री उपाध्ये यांनी सांगितले. नगरसेवक शेखर माने, शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळे, हेमंत खंडागळे, ऋषीकेश पाटील यांनी भारतनगर परिसरातील त्रस्त कुटुंबाच्या भेटी घेऊन नागरिकांना आश्‍वस्त केले. 

drains water

Web Title: Underground drains are tumbling in sangali