परवानगी न दिल्‍यास आंदोलन - क्षीरसागर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - ‘‘महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेऊन भूमिगत वायरिंगचा प्रकल्प मार्गी लावावा, अन्यथा  शिवसेना पालिकेसमोर आंदोलन करेल. आंदोलनात मी स्वतः सहभागी होईन’’, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिला. शहरातील वीज अपघात वाढत आहेत. वीज वाहिन्यांचे जाळे पाहावयास मिळते. भूमिगत वायरिंग करून शहर सुरक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने भुयारी वायरिंगचा प्रस्ताव महापालिकेला दिला. गेले दीड वर्ष हा प्रस्ताव रेंगाळला आहे. या विषयीचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले.

कोल्हापूर - ‘‘महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेऊन भूमिगत वायरिंगचा प्रकल्प मार्गी लावावा, अन्यथा  शिवसेना पालिकेसमोर आंदोलन करेल. आंदोलनात मी स्वतः सहभागी होईन’’, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिला. शहरातील वीज अपघात वाढत आहेत. वीज वाहिन्यांचे जाळे पाहावयास मिळते. भूमिगत वायरिंग करून शहर सुरक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने भुयारी वायरिंगचा प्रस्ताव महापालिकेला दिला. गेले दीड वर्ष हा प्रस्ताव रेंगाळला आहे. या विषयीचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. याबाबत आमदार क्षीरसागर ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘वीज अपघातामुळे होणारी जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी भुयारी वायरिंग होणे हा महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भात ‘महावितरण’ अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याबरोबर मी स्वतः बैठक घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा, अशा सूचना केल्या होत्या. महापालिकेत सत्ताधारींमध्ये काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांनीही यासाठी अपेक्षित पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र, हा प्रकल्प रेंगाळला. आम्ही आता ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली असून, खोदाईचा जो काही खर्च आहे तो ‘महावितरण’ देण्यास तयार आहे. असे असताना हा प्रकल्प रेंगाळून ठेवणे चुकीचे होईल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाला कोणी खो घालण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही महापालिकेसमोर आंदोलन करू, त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन.’’

प्रकल्प रेंगाळू नये, पाठपुरावा करू
खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या परदेशात आहेत. त्यांनी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेतली. भुयारी वायरिंगची कामे प्रगत शहरांत झाली आहेत, शहरातील वीज अपघात रोखण्यासाठी शहर सुरक्षित व सुशोभीत होण्यासाठी भुयारी वायरिंग होणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळला जाऊ नये, यासाठी आपण स्वतः महापालिका आयुक्तांशी चर्चा करू. त्यासाठी पाठपुराव्याचा भाग म्हणून महावितरण, महापालिका यांच्याशी पत्रव्यवहार तातडीने केल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी थेट परदेशातून ‘सकाळ’ला कळवली आहे.

Web Title: Underground electricity cable permission agitation rajesh shirsagar