कोल्हापूर शहरात होणार भुयारी मार्ग, उड्डाणपूल

कोल्हापूर शहरात होणार भुयारी मार्ग, उड्डाणपूल

‘एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन’ आराखडा - कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

कोल्हापूर - भुयारी मार्ग, उड्डाणपूल करा; पण शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. वाहतूक व्यवस्था आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पोलिस अधीक्षक कार्यालयात ही बैठक झाली.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आगामी नियोजनाचे सादरीकरण करताना खासबाग चौकात भुयारी मार्गासह इतर उपाययोजना सुचविल्या. यासाठी कोट्यवधींच्या निधीची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याची शासनाची तयारी आहे, आराखडा तयार करा, असे स्पष्ट केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘१९८० सालचे नागपूर आणि आताचे नागपूर यामध्ये खूप फरक आहे. नागपूर शहराचा विकास होत असताना वाहतुकीचेही नियंत्रण उत्तम प्रकारे झाले आहे. याच धर्तीवर कोल्हापूरच्याही शहर वाहतुकीचे नियमन होणे आवश्‍यक होते. तथापि वाहतूक कोंडीवरील समस्येवर आतापर्यंत फारशी प्रभावी उपाययोजना झालीच नाही. यापुढे ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करावा, यासाठी अपर पोलिस अधीक्षक यांनी पुढाकार घ्यावा. शहरात वाहतूक कोंडी होणारी सुमारे १९ ठिकाणे आहेत. यापैकी ज्या ठिकाणी छोट्या स्वरूपाच्या उपाययोजना करून प्रश्‍न सोडविता येईल. त्या ठिकाणी लहान स्वरूपाच्या उपाययोजना तत्काळ करा, ज्या ठिकाणी मोठ्या उपाययोजनांची आवश्‍यकता आहे, त्या ठिकाणी आवश्‍यकते नुसार उपाययोजना करा, भुयारी मार्ग, उड्डाणपूल करा, शहराच्या विकासासाठी आवश्‍यक तेवढा सर्व निधी शासन देईल.’’

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग आणि काही ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्‍यकता आहे. रस्त्यांची रुंदी वाढविण्यावर मर्यादा आहेत. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे शहर अभियंता सरनोबत यांनी स्पष्ट केले. यासाठी केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण त्यांनी बैठकीत केले. येथे त्यांनी खासबाग चौकात भुयारी मार्ग आणि अन्य ठिकाणी उड्डा पुलाची गरज असल्याचेही सांगितले. यानंतर पालकमंत्र्यांनी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी  कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जाईल, आराखडा तयार करा, अशाही सूचना दिल्या. 

यानंतर ट्रॅफिक सिग्नल्स, अनधिकृत होर्डिंग्ज, हायवे बीट पेट्रोलिंग, बेवारस वाहने, केएसबीपीकडील वाहतूक वॉर्डन, सिग्नल सिंक्रोनायझेशन, ई-चलन आदींबाबत चर्चा करण्यात आली.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, केएसबीपीचे सुजय पित्रे, पोलिस उपअधीक्षक (शहर) भरतकुमार राणे, पोलिस निरीक्षक (वाहतूक) अशोक धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

अतिक्रमण हटविले
कोल्हापूर शहरात ८ व ९ मे रोजी विशेष मोहीम राबवून ७४ अनधिकृत होर्डिंग्ज काढले. धैर्यप्रसाद चौक, भाऊसिंगजी रोड, माळकर तिकटी ते मिलन हॉटेल रोड, पापाची तिकटी ते महानगरपालिका या ठिकाणचे दुकानदार आणि फेरीवाले यांनी केलेले तात्पुरते अतिक्रमण हटविले. वाहतुकीस अडथळा करणारे १२९ दुकानदार व फेरीवाले यांच्यावर कारवाई केली.

ट्रॅफिकसाठी ७० लाख 
झेब्रा क्रॉसिंग आणि ट्रॅफिक सायनेजेस यांच्यासाठी ७० लाख रुपयांचा प्रस्ताव महानगरपालिकेने मंजूर केला आहे. त्यापैकी २० लाख रुपयांचे ‘झेब्रा क्रॉसिंग’ व ‘स्पीडब्रेकर’चे काम १२ ठिकाणी करण्यात आले आहे. १३ चौकांमध्ये काम अद्याप बाकी आहे. 

चलनासाठी मोबाइल ॲप
शहर व जिल्हा वाहतूक पोलीसांसाठी ट्रॅफिक चलन मोबाईल ॲप आणि डिव्हाईस खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

सीसीटीव्हीमुळे तपासात मदत
सीसीटीव्हीमुळे शहरासह इतर पोलिस ठाण्यांतील अकस्मात मयत, अपघात यांच्या तपासात मदत झाली आहे. वडगाव, शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, गांधीनगर व कागल हद्दीतून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ४ वर एक अधिकारी व १५ कर्मचारी ‘बीट पेट्रोलिंग’ व ‘फिक्‍स पॉईंट’ नेमले आहेत. बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीकरिता १०० पॉस युनिट देण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

सिग्नल सिंक्रोनायझेनसाठी २३ लाख...
सिग्नल सिंक्रोनायझेनसाठी महानगरपलिकेच्या स्थायी समितीने २३ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामधून ताराराणी चौक, पंचशील चौक, दाभोलकर कॉर्नर चौक, मलबार चौक, व्हीनस कॉर्नर चौक, कोंडाओळ चौक, फोर्ड कॉर्नर चौक, उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई हॉस्पिटल चौक आणि गोखले कॉलेज चौक येथील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्यात येणार आहे. 

सिग्नल, दुभाजकाची गरज...
कोल्हापूर शहरात २५ सिग्नलपैकी ११ सिग्नल बंद आहेत. ते दुरुस्त होणे गरजेचे आहे, तर क्रशर चौक, हॉकी स्टेडियम चौक, सायबर चौक, टाकाळा चौक, सीपीआर चौक, गोखले कॉलेज चौक, गंगावेस चौक, व्हीनस कॉर्नर चौक, रंकाळ रोड चौक, डी मार्टसमोर आदी चौकांमध्ये दुभाजकाची आवश्‍यकता दर्शविण्यात आली.
 

ट्रॅफिक पोलिस ॲप...
‘कोल्हापूर ट्रॅफिक पोलिस’ नावाने मोबाईल ॲप तयार केला आहे. मोठ्या प्रमाणावर संदेश देणे, वाहतुकीचे नियम मोडणारी वाहने उचलल्याचा संदेश देणे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत सर्व गाड्यांची माहिती ‘ॲप’मध्ये असेल. 
 

६१४६ वाहनधारकांना नोटिसा... 
रस्त्याकडेला लावलेली व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या नादुरुस्त व बेवारस  वाहनांचा सर्व्हे करण्यात येऊन २५९ वाहने हटविण्यात आली आहेत. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ६१४६ वाहन धारकांना नोटिसा पाठविल्या. त्यांच्याकडून १ लाख ९० हजारांचा दंड वसूल केला. केएसबीपीकडून २० वॉर्डन दिले आहेत. त्यांचाही उपयोग होत असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com