अनफिट शाळांमुळे शिक्षिका हवालदिल

Teacher
Teacher

सातारा - ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करताना फेब्रुवारीत अतिदुर्गम शाळा ‘महिलांसाठी अयोग्य’ (अनफिट फॉर वूमन) म्हणून घोषित केल्या. मात्र, त्यातील शाळा शिक्षिकांच्या माथी मारून त्यांना हवालदिल केले. शिवाय, पती-पत्नी एकत्रीकरणाचा नियम डावलत काही दांपत्यांना जिल्ह्याची दोन टोके दाखविली. बदली प्रक्रियेने सुमारे ९० टक्के शिक्षक समाधानी असले, तरी सहा टक्‍के शिक्षकांना त्रुटींचा फटका बसला आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने बदल्या केल्या. या बदल्यांनी पारदर्शकता वाढली असली, तरी त्रुटींही राहिल्या. राज्यस्तरावरील यंत्रणेला प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, दळणवळणाची सुविधा आणि शिक्षकांच्या निवासापासून नियुक्ती केलेल्या शाळेपर्यंतचे अंतर, याबाबत पुरेशी कल्पना नसल्याचे समोर आले. या बदल्या संगणकीय माहितीचा खेळ झाला. सातत्याने बदललेल्या सूचनांमुळे शिक्षकही माहिती भरताना गोंधळात पडले. त्याचा फटका शिक्षक दांपत्याला बसला. जिल्ह्यातील ३० हून अधिक शिक्षक पती- पत्नींना ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर जावे लागले. दोघांपैकी एक फलटणमध्ये, तर एक पाटणला, एक जावळीत, तर एक महाबळेश्‍वरात, एक खंडाळ्यात, तर पत्नी पाटणच्या शेवटच्या टोकाला असे चित्र समोर येत आहे. काही शिक्षक दांपत्याच्या शाळांमधील अंतर १०० ते १७० किलोमीटरवर पोचले. त्यामुळे पती-पत्नी एकत्रीकरणावर सवाल उठत आहे. 

शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक व्हाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने बदल्यांसाठी भौगोलिक क्षेत्रानुसार सुगम (सोपे) आणि दुर्गम (अवघड) अशा दोन गटांत शाळांचे वर्गीकरण केले. महिलांना दुर्गम भागातील शाळा देऊ नयेत, असा आदेश निघाला. मात्र, त्याचा उपयोग काही शिक्षिकांना झालाच नाही. २० पसंती क्रम भरताना ‘सुगम’ शाळाच उपलब्ध नसल्याने अतिदुर्गम शाळांचे पर्याय निवडावे लागले. त्यावर कहर करत शासनानेही त्यांना आदेश बाजूला सारत अतिदुर्गम शाळांवर नियुक्त केले. डोंगरावरून किंवा जंगलातून जाणारा पायी रस्ता, वाहतुकीची पुरेशी सुविधा नाही, असे अतिदुर्गम शाळांचे चित्र आहे. साहेब, तुम्हीच सांगा, अशा दुर्गम शाळांवर पोचायचे कसे, असा सवाल शिक्षिका करत आहेत.

झेडपी शाळा - २७०३
दुर्गम शाळा - ४२३
महिलांसाठी अयोग्य शाळा - ३५७
बदली झालेले शिक्षक - ४११०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com