गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा

हेमंत पवार
सोमवार, 9 जुलै 2018

कऱ्हाड - विद्यार्थ्यांनी बॅंकेत खाते काढल्यावरच गणवेशाचे पैसे जमा केले जात होते. अनेक विद्यार्थ्यांना ५०० रुपये भरून खाते काढावे लागले. त्या बदल्यात त्यांना गणवेशाचे ४०० रुपये मिळाल्याची अनेक उदारहणे घडली. त्याची शासनाने दखल घेऊन आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची योजना यंदा थांबवली आहे. आता मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
शालेय शिक्षण विभागामामार्फत केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन मोफत गणवेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बॅंकेत खाते काढल्यावर त्यांच्या खात्यावर दोन गणवेशाची ४०० रुपये रक्कम शासनाकडून जमा केली जात होती. मात्र, शालेय विद्यार्थ्यांना शून्य शिलकीवर बॅंक खाते उघडण्यासाठी बॅंका सहकार्य करत नाहीत. खात्यासाठी एसएमएस शुल्क, जीएसटी शुल्क, किमान रक्कम शुल्क असे विविध प्रकारे शुल्क आकारणी बॅंकांकडून करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना गणवेशाच्या लाभाची पूर्ण रक्कम मिळाली नसल्याचे शिक्षण खात्याने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थी या लाभापासून वंचित राहिले. परिणामी ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे, त्यांना गणवेश खरेदी करणे डोईजड झाले होते.

त्या संदर्भात अनेक तक्रारी शिक्षण खात्याकडे दाखल झाल्या. त्या शासनाला कळवण्यात आल्या. त्याची दखल घेतल्याने आता विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम हस्तांतरण करण्याची प्रक्रिया शासनाने ‘डीबीटी’तून वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याऐवजी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गणवेश देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे

राज्य शासनाचे वरातीमागून घोडे
‘डीबीटी’मुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना बॅंक खात्याच्या कारणामुळे गणवेशाचा लाभ मिळाला नाही. परिणामी शाळा सुरू होऊन अनेक दिवस झाले तरीही अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. सध्या शासनाने ‘डीबीटी’ पद्धती गणवेशासाठी असणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, शाळा सुरू होऊनही गणवेश न मिळाल्याने वरातीमागून घोडे अशीच सद्य:स्थिती आहे.

Web Title: uniform School