रक्षाबंधनाची अनोखी भेट;राहीचा भाऊ अजिंक्‍यची भावना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - राहीचा सुवर्णवेध हा आपल्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण असल्याचे राहीच्या आई प्रभा सरनोबत यांनी आज सांगितले. रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्तबगार बहिणीने भावाला दिलेली ही भेट आहे, अशा शब्दात तिचा भाऊ अजिंक्‍य याने व्यक्त केली. 

कोल्हापूर - राहीचा सुवर्णवेध हा आपल्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण असल्याचे राहीच्या आई प्रभा सरनोबत यांनी आज सांगितले. रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्तबगार बहिणीने भावाला दिलेली ही भेट आहे, अशा शब्दात तिचा भाऊ अजिंक्‍य याने व्यक्त केली. 

राहीचे सुवर्णपदक निश्‍चित होताच तिच्या घरी आनंदोत्सव साजरा जाला. आशियाई क्रीडा स्पर्धेत राहीने 25 मीटर. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक मिळविले. अपघातातील दुखापतीमुळे दोन वर्षे काहीशी बॅकफूटवर गेलेल्या राहीने थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला मागे टाकत सुवर्ण पदकावर नाव कोरले. सामना दूरदर्शनवर "लाईव्ह' पाहण्याचा आनंद कुटुंबीयांनी घेतला. आई-वडील आणि कुटुंबीयांची प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत गेली. राहीचे पदक निश्‍चित होताच कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आजी वसुंधरा यांना तर नातीचा विजय सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. या क्षणी भावासह कुटुंबीयांनी हात उंचावत आणि एकमेकांना टाळ्या देत या क्षणाचे स्वागत केले. 

राहीने रौप्य, कास्य म्हणता म्हणता सुवर्ण पदक घेतले, हा आमच्यासाठी परमोच्च आनंद आहे. तिच्याशी दोन दिवस आधी फोनवरून चर्चा झाली होती. ती स्पर्धेविषयी काही बोलत नव्हती. पण तिला आपण सुवर्णपदक घेणारच, असा आत्मविश्‍वास ती जातानाच व्यक्त केला होता. देशासाठी अभिमानास्पद असे हे आशियायी खेळातील पदक मिळवल्याने ती आमची मुलगी असल्याचा खूप अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या आई प्रभा सरनोबत यांनी व्यक्त केली. तर वडील जीवन सरनोबत यांनी तर राहीचा हा विजय कोल्हापूरकरांचे प्रेम आणि आशीर्वादाचे फळ आहे, असे सांगितले. राहीला किरकोळ अपघातात दुखापत झाली हाती. त्यामुळे ती दोन वर्षे काहीशी बॅकफ़ूटवर गेली होती. पण ती निराश झाली नाही. सराव अधिक जोमाने केला. तिच्या संघर्षाला यश मिळाले, या यशासाठी तिचे जर्मनीचे प्रशिक्षक तसेच फिजिओ थेरपिस्ट यांनीही फार परिश्रम घेतले.  प्रतिक्रिया देताना वडील जीवन सरनोबत यांचे डोळे पाणावले होते. 

राहीच्या यशाची बातमी कळताच तिच्या कुटुंबीयांचे मोबाईल वाजू लागले. आनंदाचा क्षण पाहण्यासाठी राहीच्या आजी, आई, वडील, काका, काकी, भाऊ, वहिनी यांच्यासह मित्रही उपस्थित होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार दोन वाजता या स्पर्धेत अंतिम फेरीत बरोबरी झाल्याने तणावात असताना राहीच्या विजयाची घोषणा झाली आणि सर्व कुटुंबीयांनी आनंद साजरा केला. 

राहीचे यश म्हणजे आता चार-पाच दिवसावर रक्षाबंधन आले आहे. या सणासाठी एका कर्तबगार बहिणीने लाडक्‍या भावाला दिलेली भेट आहे. तिच्या या यशाचा आम्हा कुटुंबीयांना अभिमान आहे. राही आता खऱ्या अर्थाने भारतकन्याच झालीय. सारा देश या यशाचे कौतुक करतोय. हे क्षण संपू नयेत असेच आम्हाला वाटतेय, अशी प्रतिक्रिया भाऊ अजिंक्‍य यांनी दिली. यावेळी राहीच्या घरात आई-वडील तसेच वसुंधरा सरनोबत (आजी), काकी कुंदा सरनोबत, काका राजेंद्र, भाऊ आदित्य आणि वहिनी धनश्री सरनोबत तसेच भारत कदम आणि दत्तात्रय कदम हे कुटुंबीय मित्र उपस्थित होते.

Web Title: Unique gift of Rakshabandhan says Rahi Sarnobat

टॅग्स