कळीचा कर्दनकाळ उघडकीस

सूर्यकांत वरकड
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

त्या महिलेचे नातेवाईक व "एजंटा'चे आर्थिक व्यवहारावरून बिनसले. त्या रागाच्या भरात दुसऱ्यांदा उपचारासाठी गेलेल्या महिलेने डॉक्‍टरांजवळ मन मोकळे केले आणि कळीचे कर्दनकाळ समोर आले. 

नगर : गर्भलिंगनिदान चाचणीत स्त्रीजातीचा गर्भ असल्याचे समजल्यावर औषध दुकानातून गोळ्या घेऊन गर्भपात केला. त्यानंतर उपचाराची गरज पडल्याने पीडित महिला खासगी रुग्णालयात गेली. उपचारादरम्यान महिलेकडून विसंगत माहिती मिळाल्याने डॉक्‍टरांना संशय आला. दुसऱ्या दिवशी त्या महिलेचे नातेवाईक व "एजंटा'चे आर्थिक व्यवहारावरून बिनसले. त्या रागाच्या भरात दुसऱ्यांदा उपचारासाठी गेलेल्या महिलेने डॉक्‍टरांजवळ मन मोकळे केले आणि कळीचे कर्दनकाळ समोर आले. 

जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथील हा प्रकार चव्हाट्यावर आल्यावर तालुक्‍यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी पीडित महिला अश्‍विनी वायफळकर, पती मच्छिंद्र वायफळकर, सासू सुमन वायफळकर, डॉ. पाटील, जामखेडमधील औषधविक्रेता ज्ञानदेव ऊर्फ माऊली गायकवाड आणि काही एजंट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वंशाच्या दिव्यापायी सगळे कुटुंबच कायद्याच्या कचाट्यात सापडले. 

वायफळकर हे सामान्य कुटुंब. सर्वांनाच मुलाची आस असताना, अश्‍विनीला सलग तीन मुली झाल्या. त्यानंतर एजंटामार्फत हे कुटुंब गर्भलिंग तपासणीसाठी थेट अकलूजजवळील (जि. सोलापूर) एका छोट्या गावात गेले. तेथील नराधम डॉक्‍टर व अन्य लोकांच्या मदतीने गर्भलिंग तपासणी केली. त्यात स्त्रीजातीचाच गर्भ असल्याचे डॉक्‍टरनी सांगितल्यावर सर्वच नाराज झाले. चार महिन्यांचा गर्भ पाडायचा कसा, असा प्रश्‍न पडला. 

जामखेडमध्ये आल्यानंतर एजंटच्या मध्यस्थीने शहरातील औषधविक्रेता गायकवाड याच्या दुकानातून विनापरवाना गोळ्या घेऊन गर्भपात केला. नंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात अश्‍विनी उपचारासाठी गेली. 

उपचारादरम्यान गर्भपाताचा संशय आल्याने डॉक्‍टरांनी तिच्याकडे विचारपूस केली; पण तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉक्‍टरांनी गर्भपात टाळण्यासाठी पुढील उपचाराचा सल्ला दिला असता, अश्‍विनीने त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे डॉक्‍टरांचा संशय वाढत गेला. त्यांनी तिला तपासणीसाठी पुन्हा बोलाविले. तिसऱ्या दिवशी रक्तस्राव होत असल्याने महिला पुन्हा त्या रुग्णालयात आली. 

दरम्यान, त्याच दिवशी सकाळी एजंट व महिलेच्या नातेवाइकांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता. त्या रागाच्या भरात अश्‍विनीने सगळी हकिगत डॉक्‍टरांना सांगून मन मोकळे केले आणि गर्भातच कळी खुडणाऱ्यांचे कुकर्म समाजासमोर आले. 

"त्या' डॉक्‍टराचा शोध सुरू 

बीड जिल्ह्यात गर्भलिंगनिदान करून गर्भातच कळ्या खुडल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या घटनेनंतर जामखेड येथील आरोग्य विभाग जागा झाला. पोलिसांनी गर्भपाताच्या गोळ्यांचे किट जप्त केले. गर्भलिंग तपासणी करणाऱ्या, अकलूज (जि. सोलापूर) येथील डॉक्‍टराचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. 

सर्वच केंद्रांची तपासणी करणार. 

जामखेड शहरासह तालुक्‍यात आठ नोंदणीकृत गर्भपात केंद्रे आहेत. तेथूनच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होते. मात्र, अन्य औषध दुकानांतूनही गर्भपाताच्या गोळ्या सर्रास दिल्या जात असल्याचे समोर आल्याने, आता सर्वच केंद्रांची तपासणी करणार आहे. 

- डॉ. युवराज खराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, जामखेड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unlawful disclosure