विद्यार्थ्यांचा जीव गुदमरतोय! 

परशुराम कोकणे 
मंगळवार, 19 जून 2018

सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांत चिमुरड्यांचा जीव गुदमरला जातोय. वाहन छोटे आणि विद्यार्थी संख्या अधिक असे चित्र आहे. सोमवारी शाळेचा दुसरा दिवस होता. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. 

सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांत चिमुरड्यांचा जीव गुदमरला जातोय. वाहन छोटे आणि विद्यार्थी संख्या अधिक असे चित्र आहे. सोमवारी शाळेचा दुसरा दिवस होता. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. 

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा विषय नेहमीच चर्चेत असतो. ऑटो रिक्षा, ऍपे रिक्षा, छोटी कार आणि स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते. काही स्कूलबस वगळता इतर वाहनांत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसविले जाते. 2015 मध्ये धावत्या रिक्षातून विद्यार्थिनी पडल्याची घटना होटगी नाका परिसरात घडली होती. खासगी वाहने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोचवितात. वाहन लहान आणि विद्यार्थ्यांची संख्या अधिक असा प्रकार सर्रास पाहण्यात येत आहे. 15 जूनपासून शाळांना सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची फारशी गर्दी नव्हती. पण सोमवारी मात्र क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. 

मुलांना कमी पैशात शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा, बस आणि कारचालकांचा शोध पालक मंडळी घेत असल्याचे दिसून येत आहे. दाटीवाटीने मुलांना बसविले जात आहे. सुजाण पालक, शाळा, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मर्यादित ठेवायला हवी. प्रत्येक शाळेत विद्यार्थी वाहतूक परिवहन समिती अनिवार्य करण्यात आली आहे, पण शाळांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. 

हे आहेत नियम.. 
- शाळांत परिवहन समितीची स्थापना 
- मुख्याध्यापक असतील समितीचे अध्यक्ष 
- समितीत पालक संघटनेच्या सदस्यांचा समावेश 
- वाहनांत नकोत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी 
- विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनाची पुनर्तपासणी आवश्‍यक 
- वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन आवश्‍यक 
- वाहनाला विद्यार्थी वाहतुकीचा परवाना आवश्‍यक 
- स्कूल बसमध्ये खिडक्‍यांना हवेत बॅरिगेट्‌स 
- इमर्जन्सी एक्‍झीटसाठी खिडकी 
- विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी हवी महिला मदतनीस 

मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी दक्ष असणे आवश्‍यक आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असणाऱ्या वाहनातून आपल्या मुलांना शाळेत पाठवू नका. मंगळवारपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांची तपासणी करण्यात येईल. 
- अशोक पवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 

बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती प्राचार्य, मुख्याध्यापकांनी पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास कळवावी. माहिती न कळविणाऱ्या शाळांवर कारवाईची शिफारस केली जाईल. 
- वैशाली शिंदे, सहायक पोलिस आयुक्त 

वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवले जाते. हे फारच धोकादायक आहे. लहान-मोठी मुले एकाच वाहनात बसवण्यात येतात. हातात स्कूल बॅग, डबा असतो, बसण्यास जागा नसते. चालकाचे मुलांकडे लक्ष नसते. मुले व्यवस्थित बसली की नाही हे पाहत नाहीत. विद्यार्थी वाहतुकीबाबत फारच निष्काळजी दिसते. 
- मानसी गोरे, पालक

Web Title: unlimited students in auto and school bus