अशास्त्रीय आहार धोक्याचा

सुधाकर काशीद
बुधवार, 4 जुलै 2018

कोल्हापूर - ‘‘किरणला व्यायामाची आवड जरूर लागली. पण, त्याने व्यायामातून आरोग्यापेक्षा व्यायामापासून आकर्षक दिसण्यावर भर दिला. तो नियमित व्यायाम करू लागला. पण, शरीर आकर्षक दिसावे म्हणून तो नेहमीच्या आहाराऐवजी इतरच आहार जास्त घेऊ लागला. सोबत ताकद वाढविणारी कसलीही औषधे घेऊ लागला. या आहाराला, औषधाला कोणताही शास्त्रीय आधार नसतानाही तो त्याचा वापर करू लागला. त्याची तब्येत जरुर वाढली; पण हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर सूज जाणवू लागली. आणि एक दिवस छातीत जोराची कळ आली. सर्वांची धावपळ उडाली. आणि तपासणीनंतर लक्षात आले की नियमित व्यायाम करूनही त्याला गंभीर स्वरूपाचा ह्रदयविकार झाला आहे.’’

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ह्रदयरोग उपचार विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना हे या एका व्यायामप्रेमी रुग्णाबद्दल सांगत होते. 

ते म्हणाले, ‘‘शरीराला रोज व्यायाम आवश्‍यक आहे. शरीरसौष्ठवासाठी तर व्यायामाची वेगवेगळी साधने आहेत. त्याचा वापरही योग्य आहे. पण, व्यायामाला अनेक तरुण नको तो आहार व नको त्या औषधाची मनानेच जोड देत आहेत. अशा वेगवेगळ्या डब्यातून विकत मिळणारा आहार घेतला तर तब्येत लवकर व अधिक चांगली होते, असा बहुतेकांचा समज असतो. अशा कोठेही मिळणाऱ्या आहाराला आणि औषधाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पण, ही औषधे व हा आहार तरुण मोठ्या प्रमाणात घेत आहेत. ही औषधे घेतली की या तरुणांना मोठी भूक लागते. ते अधाशासारखे खातात. पाहता-पाहता त्यांची तब्येत वाढते. पण, नको ती औषधे आणि नको तो आहार याचा परिणाम त्यांच्या रक्तवाहिन्यांवर होतो. आतडी आणि मूत्रपिंडाची प्रक्रिया बिघडते. रक्तवाहिन्यांत गुठळ्या तयार होतात. आणि त्याचा खूप मोठा धोका असतो. तब्येत चांगली दिसावी म्हणून कोणताही शास्त्रीय आधार नसलेला हा आहार व औषधे सेवन करणारे अनेक तरुण असल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘असला अनैसर्गिक आहार खूप धोकादायक आहे. पण, त्या आहाराचीच सध्या ‘क्रेझ’ आहे. आम्ही ज्या रुग्णावर उपचार केले, तो रुग्ण वेळेत उपचारासाठी आला म्हणूनच वाचू शकला. पण, या उदाहरणावरून इतरांनी शहाणे व्हावे एवढीच अपेक्षा आहे.’’ 

भाकरी, भाजी, भात, फळे, कडधान्ये, दूध, तूप, अंडी, पालेभाज्या, भरपूर पाणी यापेक्षा दुसरा चांगला आहार नाही आणि यापेक्षा चांगला आहार अशी जाहिरात करून नको तो बाजारात आणला जात असेल तर आपण त्याला रोखू शकत नाही.  
- डॉ. अक्षय बाफना, हृदयरोग उपचार विभागप्रमुख, सीपीआर

नको तो कृत्रिम आहार म्हणजे उत्तेजक द्रव्याचाच प्रकार आहे. व्यायामपटूंनी चिकन, अंडी, केळी, दूध, कडधान्ये, पालेभाज्या, सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ घ्यावेत. त्यानेच तब्येत चांगली बनते. व्यायामपटूंनी नको तो आहार घेऊ नये. 
- बिभीषण पाटील, भारत श्री

Web Title: unprofessional food dangerous