अवकळा...असंरक्षित स्मारकाची!

पाच एकरांवर पसरलेल्या या राजप्रासादाची देखभालीअभावी झालेली आजची दुर्दशा.
पाच एकरांवर पसरलेल्या या राजप्रासादाची देखभालीअभावी झालेली आजची दुर्दशा.

शाहूनगरीची जडणघडण आणि तिच्‍या यशोगाथेचा मूक साक्षीदार असलेला ऐतिहासिक राजवाडा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे खरा; पण, स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असूनही हा राजवाडा आज शासकीय उदासिनतेमुळे अवकळा सोसतो आहे. उद्या (मंगळवारी) सर्वत्र जागतिक वारसा दिवस साजरा होत आहे. असा कोणता दिवस असतो हे १७३ वर्षांच्या या राजप्रासादाला कदाचित ज्ञातच नसावे. कडेकोट बंदोबस्तातील या वाड्याच्या चोरवाटा आज मात्र उघड्या पडल्या आहेत. चोर-उचक्‍यांचा या वाड्यातील लीलया वावर नित्यनेमाचा झाला असल्याचे येथे दिसते. अशा वाड्याची अवकळा मांडणारे हे शब्दचित्र....

श्रीमंत छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी १८२४ मध्ये जुना राजवाडा बांधला. त्यांच्या पश्‍चात त्यांचे धाकटे बंधू अप्पासाहेब महाराज यांनी शेजारीच १८४४ मध्ये स्वत:साठी नवा राजवाडा बांधून घेतला. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे बांधकामासाठी लागणारे लाकूड संपूर्णत: सागवानी आहे. लाकूड दीर्घकाळ टिकण्यासाठी सागवानाचे सोट काही दिवस करंजाच्या तेलात भिजत टाकण्यात आले होते. ब्रिटिशांनी साताऱ्याची गादी खालसा केल्यानंतर काही काळातच नव्या राजवाड्यात न्यायालय भरू लागले; ते अगदी एप्रिल २००३ पर्यंत..! त्यानंतर मात्र सरकारी यंत्रणेने या वाड्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. या वाड्याच्या देखभालीची जबाबदारी कागदोपत्री तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. अत्यंत मजबूत असलेल्या या राजप्रासादाची केवळ देखभाल करण्याची आवश्‍यकता आहे.

गेली १४ वर्षे धूळखात पडल्याने चोरा-उचक्‍यांनी त्याची लक्तरे काढली आहेत. या वाड्याच्या दोन्ही प्रमुख दरवाजांना मोठी कुलूपे घालण्यात आली आहेत. मात्र, चोरा-उचक्‍यांचा वाड्यात लीलया वावर असल्याचे लोक सांगतात. वाड्यातील दरबार हॉलसमोरील प्रांगणात झाडे-झुडपे उगवली आहेत. दरबार हॉलच्या दर्शनी भागातील लोखंडी जाळ्या भंगाराच्या आमिषाने चोरीस गेल्या आहेत. दरबार हॉलमध्ये चोरून नेण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे हा देखणा हॉल पाय रोवून उभा असला तरी त्याच्या दोन्ही बाजूची कारंजी तांब्याच्या धातूसाठी कापून चोरून नेण्यात आली आहेत. ४० ते ५० कारंजी यापूर्वीच चोरीस गेली आहेत. 

राजवाड्याच्या दर्शनी भागात, एका बाजूस मराठा आर्ट गॅलरी भरविली जायची. यातील काही खोल्यांमध्ये १८ व्या शतकातील, प्राचीन भित्तिचित्रे आहेत. पावसाचे पाणी पडून यातील एक चित्र खराब झाल्याचे दिसते. लाकडी कोरीव कामाचा अनोखा नमुना असलेली काही दालने या वाड्यात अद्याप आहेत. पण, हे साहित्यही चोरीस जाण्याचा धोका संभवतो. 

प्रस्‍तावाचे पाऊल अडखळलेलेच...
नव्या राजवाड्याचे ऐतिहासिक संरक्षित स्थळ म्हणून जतन व्हावे, यासाठी तत्कालिन उद्योग व सांस्कृतिक कार्यमंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तत्कालिन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी २००७-०८ या काळात प्रयत्न केले. घोषणा झाल्या. मात्र, प्रत्यक्षात प्रस्ताव एक पाऊलही पुढे सरकला नाही.

संरक्षित स्‍थळ करा...
सरकारी इमारत म्हणून पूर्वी वापरात असलेल्या या राजप्रासादाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, या वास्तूचा ताबा विधी व न्याय खात्याकडे असल्याचे सांगण्यात येते. या ऐतिहासिक राजप्रासादाचे संरक्षित स्थळ म्हणून जतन व्हावे, अशी इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे. पुरातत्त्व विभागाने या वाड्याची देखभाल-दुरुस्तीची कामे करून वाड्याचे जतन करावे, अशी सातारकरांची भावना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com