शहरी भागात नोटांचा खडखडाट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - बॅंकांना सुटी त्यात मोजकीच एटीएम सुरू आणि तेथेही दोन हजारची नोट, अशा मनस्तापाला आज नागरिकांना सामोरे जावे लागले. एटीएममधील रांग काही संपता संपेना, अशी स्थिती झाली. 

कोल्हापूर - बॅंकांना सुटी त्यात मोजकीच एटीएम सुरू आणि तेथेही दोन हजारची नोट, अशा मनस्तापाला आज नागरिकांना सामोरे जावे लागले. एटीएममधील रांग काही संपता संपेना, अशी स्थिती झाली. 

सलग दोन दिवसांच्या सुटीमुळे बॅंकांचे कामकाज सोमवारी (ता. 28) सुरू होणार आहे. तत्पूर्वी करन्सी चेस्टमधून वितरित झालेली साडेतीनशे कोटींची रक्कम संपत आली आहे. पंधरा दिवसांत रकमेची मागणी करणाऱ्यांचा प्रचंड रेटा आणि प्रत्यक्ष रकमेचा तुटवडा अशी विषमता निर्माण झाली. या आठवड्यात कशीबशी एटीएम सुरू झाली. मात्र, सलग सुट्यांमुळे एटीएमवर गर्दी झाली. साडेतीनशेहून अधिक एटीएम सुरू झाली खरी; पण दोनच दिवसात रकमेवर मर्यादा आल्याने तेही बंद पडले. शहरी भागाऐवजी ग्रामीण भागातील एटीएममध्ये रक्कम भरण्यास अधिक प्राधान्य दिले गेले. त्याचे परिणाम शहरी भागातील एटीएमवर झाले. आज सकाळपासून केवळ एकाच राष्ट्रीयीकृत बॅंकेचे एटीएम सुरू होते. तेथेही एका कार्डवर केवळ दोन हजारची नोट मिळत होती. पैसे मिळतात ठीक आहे; पण ही नोट घेऊन करायचे काय, असा प्रश्‍न नागरिकांना पडला. 

शहरासह, उपनगरातील एटीएमला फेऱ्या मारून लोक घाईला आले. रांगेत असलेल्यांना इथे किती निघतात, शंभराच्या नोटा आहेत का, अशी विचारणा होत होती. जिल्ह्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि आरबीएल या बॅंकांकडे नोटाबंदीनंतर रक्कम वाटपाबाबतचे अधिकार आहेत. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांना त्यांच्या करन्सी चेस्टमधून पुरवठा होतो. मुंबईहून रक्कम मिळाली की करन्सी चेस्टमध्ये जमा होते. दोन दिवसांच्या सुटीमुळे सोमवारी मुंबईहून रक्कम निघाली की ती मंगळवारी पोचेल. त्यामुळे याच दिवशी एटीएम सुरू होण्याची शक्‍यता आहे. उद्या (रविवारी) आणखी नोटाटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

सुट्या पैश्‍यांअभावी पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. एरव्ही पंधरा आणि वीस रुपयांशिवाय पालेभाज्यांना हात लावू दिला जात नव्हता. आज मेथीची जुडी दहा रुपयांना दोन अशी विकली जात आहे. फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, मिरची यांचे दर गडगडले आहेत. नोटाबंदीचा फटका भाजी विक्रेत्यांना बसला आहे. जुन्या नोटा चालत नाहीत आणि सुटेही हाती नाहीत, अशी स्थिती आहे. 

Web Title: In urban areas currency problem