शौचालयवापराच्या प्रमाणपत्राची डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

सोलापूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या राज्यातील कोणत्याही व्यक्तीला शौचालयाचा वापर करत असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव व प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. ते न दिल्यास त्याला निवडणूक लढविता येणार नाही. मात्र, शहरात राहणाऱ्या उमेदवाराला जर ही निवडणूक लढवायची असेल, तर ग्रामपंचायतीचा ठराव कसा मिळवायचा? त्यामुळे हा ठराव व प्रमाणपत्र मिळविण्याची डोकेदुखी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांना सतावत आहे.

शौचालयाचा वापर करत असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव व ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविताना सादर करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने 7 ऑक्‍टोबर 2016 रोजी पत्र काढले आहे. त्या पत्रामध्ये संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव घेण्यास सांगितले आहे. जर ठराव देण्यास संबंधित उमेदवार अपयशी ठरला, तर त्याला निवडणूक लढविता येणार नाही, असा उल्लेख त्या पत्रात आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती शहराच्या ठिकाणी राहतात. त्या व्यक्तीचे नाव जरी गावातील मतदार यादीमध्ये असले, तरी त्याचे घर गावात नाही. त्यामुळे तो गावचा रहिवासी होणार नाही. तो रहिवासी नसेल तर त्याला ग्रामसभेचा ठराव देता येत नाही. मात्र, या निवडणुकीत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक केला आहे. त्यामुळे गावात नाव असूनही केवळ शहरात राहत असल्यामुळे ग्रामसभेचा ठराव देता येत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जे मतदारसंघ शहराच्या लगत आहे, त्या ठिकाणच्या अनेक उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे.

ग्रामपंचायतीमध्ये होणार राजकारण
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीच्या विरोधी पक्षाची जर ग्रामपंचायत असेल, तर त्याला ग्रामसभेचा ठराव मिळणार का? ठराव देण्यावरून जर राजकारण झाले तर संबंधित इच्छुक निवडणुकीला मुकण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर शहरालगत जिल्हा परिषदेचे काही गट आहेत. काही तालुक्‍यांतील व्यक्ती सोलापूर शहरात राहतात. गावात त्यांचे घर नाही. त्यामुळे ग्रामसभेचा ठराव त्यांना मिळणे अशक्‍य आहे. याबाबत काय करावे, याचे मार्गदर्शन ग्रामविकास विभागाकडे मागितले आहे.
- अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Use the toilet certificate